Pune News: स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेमध्ये पुणे शहराचा पाचवा क्रमांक

एमपीसी न्यूज: स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेमध्ये पुणे शहराने पाचवा क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी सतराव्या क्रमांकावर असणाऱ्या पुण्याने ही मोठी झेप घेतली आहे त्यामुळे महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर पुणे असून प्रथम क्रमांकावर नवी मुंबई आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, घनकचरा विभागाचे प्रमुख अजित देशमुख, स्वच्छ सर्वेक्षणाच्या उपायुक्त आशा राऊत, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत’ देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात देशात पुन्हा एकदा इंदोरने पहिला क्रमांक मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर सुरत, तिसऱ्या क्रमांकावर विजयवाडा, चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. १० लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या सर्वेक्षणात देशातील ४८ शहरांनी सहभाग घेतला होता.

अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, “स्वच्छ सर्वेक्षणात लोक सहभाग वाढविल्याने महापालिकेला हे यश मिळाले आहे. भविष्यात देखील लोकसहभागातून अधिक प्रयत्न केले जातील. त्यामुळे प्रथम क्रमांक मिळविण्याच्या दृष्टीने तयारी करता येईल”.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ”गेल्या वर्षी पुण्याचा १७ वा क्रमांक आला होता. पण यंदा देशात पाचवा क्रमांक आला आहे. या पुरस्काराचे श्रेय पुणेकर नागरिक, महापालिका प्रशासनातील कर्मचारी, अधिकारी यांचे आहे. आगामी काळात देखील अनेक समाज समाज उपयोगी व पर्यावरण पूरक उपक्रम राबवून पुण्याच्या गौरवात भर घातली जाईल.’

दरम्यान कचरामुक्त शहर स्टार रेटिंग प्रोटोकॉल अंतर्गत लोणावळा नगर परिषदेला केंद्रीय नगर विकास सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते थ्री स्टार मानांकनाने गौरविण्यात आले.

तर कचरामुक्त शहर स्टार रेटिंग प्रोटोकॉल अंतर्गत जेजुरी नगर परिषदेला केंद्रीय नगर विकास सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते थ्री स्टार मानांकनाने गौरविण्यात आले. नगराध्यक्षा वीणा सोनवणे आणि मुख्याधिकारी पूनम कदम यांनी पुरस्कार स्वीकारला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.