_MPC_DIR_MPU_III

Pune News : पुणे पदवीधर, शिक्षकचा विजयाचा कोटा ठरण्यासाठी रात्रीचे 9 वाजणार

पहिल्या पसंतीमध्ये विजय न मिळाल्यास निकाल यायला 40 तास लागण्याचा अंदाज

एमपीसीन्यूज : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला पुण्यातल्या बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघाचा निकाल पहिल्या पसंतीच्या मतामध्येच लागणार की पुढील फेऱ्यांची मतमोजणी करावी लागणार याबाबतचे चित्र पदवीधरसाठी रात्री नऊच्या सुमारास, तर शिक्षकसाठीचे चित्र साधारण सायंकाळी सातवाजे पर्यत स्पष्ट होऊ शकते, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_IV

दरम्यान, सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरवातीला विभागातील पाच जिल्ह्याच्या मतपत्रिका तसेच पोस्टल मत पत्रिका एकत्र करण्यात आल्या. पदवीधरसाठी 867 पोस्टल, तर शिक्षकसाठी 32 पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.

या सर्व मतपत्रिका सरमिसळ करण्याचे काम सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण व्हायला दुपारचे दोन वाजणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून वैध अवैध मत बाजूला करत असतानाच पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाणार आहे.

पोस्टल मतदानासह पदवीधर मतदारसंघासाठी 2 लाख 47 हजार 917, तर शिक्षकसाठी 53 हजार19 इतके मतदान झाले आहे. या सर्व मतपत्रिका एकत्र करून त्यातल्या वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या केल्या जात असतानाच विजयाचा कोटा ठरण्यासाठी रात्रीचे नऊ वाजू शकतात, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

जर या प्रक्रियेत एखाद्या उमेदवाराने विजयासाठीचा कोटा पूर्ण केला, तर शिक्षकचा निकाल साधारण सायंकाळी 7 वाजता, तर पदवीधरचा निकाल रात्री नऊ वाजता लागू शकतो.

पहिल्या पसंतीच्या मतामध्येच विजय मिळवण्यासाठी वैध मतदान भागिले 2, अधिक 1 मत आवश्यक आहे. त्यामुळे एकतर्फी निवडणूक झाल्यास रात्री नऊ वाजता निकाल अपेक्षित आहे.

पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण होऊ शकला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहेत आणि ही प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास त्याच्या पदवीधरसाठी 60 फेऱ्या, तर शिक्षकसाठी 32 फेऱ्या घ्याव्या लागणार आहेत.

प्रत्येक फेरीसाठी अंदाजे अर्धा तास वेळ गृहीत धरल्यास निकाल लागण्यासाठी आज रात्री 9 नंतर पुढे 30 तासांचा कालावधी पदवीधरसाठी लागू शकतो, तर शिक्षकसाठी 16 तास लागू शकतात असा प्रशासनाचा अंदाज आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.