Pune News : पुणे ‘2021 ग्लोबल मेयर्स चॅलेंज’मध्ये अंतिम फेरीत !

भारतातील केवळ दोन शहरे त्यापैकी पुणे; जगभरातील 631 महापौरांमधून निवड

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीशी सामना करत असतानाही अभिनव संकल्पनांची अंमलबजावणी करणार्‍या शहरांसाठी घेण्यात आलेल्या ‘ग्लोबल २०२१ मेयर्स चॅलेंज’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याचा समावेश झाला आहे. ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपीजच्या वतीने ‘2021 ग्लोबल मेयर चॅलेंज’चे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल मेयर्स चॅलेंजमध्ये 99 देशांतील 631 शहरांनी अर्ज केले होते. त्यातील पहिल्या ५० शहरांत पुण्याचा समावेश आहे.

पुणे शहराच्या वतीने सर्व इलेक्ट्रिक वाहनांचा भविष्यसाठी महत्त्वपूर्ण पाया’ ही योजना ‘2021 ग्लोबल मेयर्स चॅलेंज चॅम्पियन सिटीज’ या स्पर्धेसाठी सादर करण्यात आली होती. यातील हवामान आणि वातावरण या घटकांतर्गत पुण्याची निवड झाली आहे.

स्पर्धेची अंतिम फेरी जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत होईल. आणि यातून अंतिम 15शहरांची निवड होईल. यात निवड होणार्‍या प्रत्येक शहराला त्यांच्या संकल्पनांची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी भरभक्कम तांत्रिक साहाय्य दिले जाईल. या स्पर्धेविषयी अधिक तपशील देताना ब्लूम्बर्ग फिलाँथ्रॉपीजचे संस्थापक मायकेल ब्लूम्बर्ग म्हणाले की, ‘‘कोरोना महामारीच्या प्रचंड आव्हानांचा सामना करत असताना, अनेक शहरे धाडसी, नावीन्यपूर्ण व महत्त्वाकांक्षी संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यापुढील काही महिन्यांमध्ये या शहरांना त्यांच्या संकल्पनांची चाचणी करण्यास मदत केल्याने शहरे अधिक सामर्थ्यवान होतील. आत्यंतिक प्रगत धोरणे व कार्यक्रम स्वीकारून ते अमलात आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन लाभेल.’’

या निवडीबद्दल बोलताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘इलेक्ट्रिक व्हेईकल याविषयीची पुण्याच्या प्रस्तावित कामासाठी अंतिम स्पर्धेसाठी निवड केल्याबद्दल ‘ब्लूम्बर्ग’चे मनापासून आभार. पुणे शहर हे देशातील वास्तव्यासाठीचे सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे. पुणे हे शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व वाहन उद्योग यांचे केंद्र आहे. पुण्याने भक्कम नागरी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे, परंतु त्याचबरोबर झालेल्या शहराच्या विस्तारामुळे वाहन प्रदूषणामध्येही वाढ झाली आहे. पर्यावरणस्थित वाहतूक व्यवस्थेसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचा आमचा संकल्प आहे.

इलेक्ट्रिकवर चालणार्‍या वाहनांचा व्यापक स्तरावर वापर करण्याचा आमचा संकल्प आहे. पुणे शहरात विजेवर चालणार्‍या वाहनांच्या वापरासाठी योजना आखून तिची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. या योजनेची जगभरातील अन्य शहरांद्वारेही अंमलबजावणी केली जाईल. मला खात्री आहे. आम्ही राबवत असलेल्या संकल्पनेमुळे हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होईल आणि पुण्याच्या नागरिकांना उत्तम आरोग्यही लाभेल, असेही महापौर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘‘पुणे शहरात इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा वापर वाढण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन निधी उभारून लवकरात लवकर इलेक्ट्रिक व्हेइकल्स सुरुवात करण्याचा प्रस्ताव आम्ही ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉफीजकडे सादर केला आहे. विजेवरील वाहनांचा वापर वाढावा यासाठी कृतीयोग्य धोरणे आखणे व ही वाहने चालवण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचनांचा आराखडा महापालिका तयार करेल. यासाठीचा इव्ही निधी हा वाहनांकरिता प्रोत्साहनपर आर्थिक सवलती, चार्जिंग स्टेशन्स, इतर संभाव्य संबंधित घटक अशा सर्व गोष्टींचा एकत्रित आराखडा तयार करण्याकरिता वापरला जाईल.’’

विजेवर चालणार्‍या वाहनांचा वापर सुरू करण्याकरिता पुणे महापालिका ब्लूमबर्ग निधीचा विनियोग पुढील गोष्टींसाठी करेल
१) सिटी इव्ही रेडिनेस प्लॅन तयार करणे
२) सिटी इव्ही निधी उभारणे

पुणे महानगरपालिका गरजूंचे मूल्यमापन करेल आणि योजनेतील कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे हे निश्चित करण्याकरिता काही कार्यशाळा आयोजित करेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.