मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Pune News : 3 ते 10 मार्च दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मंगळवारपासून नोंदणी प्रक्रियेला सुरूवात

एमपीसी न्यूज – 20 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुणे 3 ते 10 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाच्या नोंदणी प्रक्रियेला उद्या दिनांक 15  फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. तसेच यंदाचा पिफ चित्रपटगृहांबरोबरच ऑनलाईन माध्यमातून देखील आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.

यावेळी पिफच्या आयोजन समितीचे सदस्य रवी गुप्ता, अभिजित रणदिवे, सतीश आळेकर, समर नखाते आणि मकरंद साठे आदी उपस्थित होते.

यंदाच्या पिफची थीम ही भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, चित्रपट क्षेत्रातील चतुरस्त्र व्यक्तीमत्व भारतरत्न सत्यजित रे आणि प्रसिद्ध गीतकार पद्मश्री साहीर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दी वर आधारित असेल आणि त्यानुसार महोत्सवादरम्यान काही विशेष कार्यक्रम करण्यात येतील व त्याचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल असे डॉ. पटेल यांनी यावेळी सांगितले. 20 वा पिफ दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर यांना समर्पित करण्यात येणार असल्याची माहिती पटेल यांनी यावेळी दिली.

महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी चित्रपट महोत्सवाच्या संकेत स्थळाच्या www.piffindia.com माध्यमातून उद्या दिनांक दि.15 फेब्रुवारी पासून करता येईल. स्पॉट रजिस्ट्रेशन द्वारे नोंदणी दि.17 फेब्रुवारी पासून महोत्सव आयोजित होणाऱ्या 3 ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 7.30 या वेळेत करता येईल. ज्यामध्ये सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर, लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि वेस्टएंड मॉल, औंध येथील सिनेपोलीस या चित्रपटगृहांचा समावेश आहे. यंदाचा पिफ मधील चित्रपट वर नमूद 3 ठिकाणच्या 8 पडद्यांवर दाखविले जाणार आहेत. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत एका पडद्याची भर झाली आहे.

ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या चित्रपट महोत्सवात निवडक 26 चित्रपट दाखवले जातील व त्यासाठीचे नोंदणी शुल्क प्रती नोंदणी रुपये 600 इतके असेल.  चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवातील चित्रपट पाहण्यासाठीचे नोंदणी शुल्क हे प्रती व्यक्ती रुपये 700 इतके असेल. यात तब्बल 120 चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी सिनेरसिकांना मिळेल. ऑनलाईन आणि चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवात सहभागी होण्यासाठीची नोंदणी वेगवेगळी करावी लागेल याची सिनेरसिकांनी नोंद घ्यावी.  पिफ होणाऱ्या काळात राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने लागू केलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन चित्रपटगृहात करण्यात येईल. या संदर्भातील नियम व अटी या www.piffindia.com संकेतस्थळावर देण्यात येतील.

Latest news
Related news