New Delhi News : फटाकेबंदी असूनही पुणे देशातील दुसरे सर्वाधिक प्रदुषित शहर !

Safar's Dr. Gufrem Beg

एमपीसी न्यूज (यशपाल सोनकांबळे) : यंदा कोरोना संकटाच्या सावटामध्ये दिवाळी साजरी झाली. सार्वजनिक ठिकाणी फटाकेबंदी असूनही पुणे देशातील दुसरे सर्वाधिक प्रदुषित शहर ठरलं आहे. ‘सिस्टिम ऑफ एयर क्वालिटी ॲण्ड वेदर फोरकास्टिंग ॲण्ड रिसर्च’ (सफर) च्या सर्वेक्षणामध्ये पहिल्या स्थानावर दिल्ली शहर सर्वाधिक प्रदूषित होते, पुणे दुसऱ्या, अहमदाबाद शहर तिसऱ्या, तर मुंबई चौथ्या स्थानावर आहे.

देशातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी सणाची ओळख आहे. फटाके, पुजासाहित्य आणि घनकचऱ्यामुळे जल, ध्वनी, हवा आणि जमीनीच्या प्रदुषणात भर पडत असते.

यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे प्रदुषणात घट होण्याची शक्यता होती. परंतु, दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे ध्वनी आणि हवा प्रदुषणात भर पडली असली तरी गत वर्षीच्या तुलनेत प्रदूषणाची पातळी किंचित कमी आहे.

या सर्वेक्षणासंदर्भात बोलताना ‘सफर’चे डॉ. गुफ्रेम बेग म्हणाले, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर सर्वेक्षण केले. यंदाच्या दिवाळीमध्ये देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये फटाकेबंदी होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात प्रदुषणाची पातळी गेल्या 15 वर्षांच्या तुलनेत कमी होती.

दिवाळीमध्ये फटाकेबंदी होती तरीही दिल्ली देशातील सर्वाधिक प्रदुषित शहर ठरलं, तर दुसऱ्या स्थानावर पुणे शहर, अहमदाबाद शहर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर मुंबई प्रदुषित शहर ठरलं.

दिवाळीच्या चार दिवसांमध्ये देशातील प्रदुषणाची पातळी वाढली होती. मात्र, दिवाळी नंतर दिल्ली आणि पुण्यातील प्रदुषणाची पातळी कमी वेगाने घटत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.