Pune News : पुणे मेट्रोला वेगवेगळ्या पातळ्यांवर तीन आयएसओ मानांकन

एमपीसी न्यूज – शहरात पीसीएमसी ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये मेट्रो रेल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हा मार्ग एकंदर 31 किमीचा असून त्यात 6 किलोमीटर लांबीचा कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा भुयारी मार्ग आहे. सध्या पुणे मेट्रोचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. विविध पातळ्यांवर कामाची गुणवत्ता नियमितपणे तपासली जाते आहे. ही गुणवत्ता जागतिक दर्जाच्या NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये परीक्षण केले जात आहे.

महामेट्रोच्या गुणवत्ता नियंत्रक प्रणाली यामध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी महामेट्रोने ISO 9001 या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. 4 मार्च 2021 रोजी महामेट्रोला ISO 9001 : 2015 हे गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

महामेट्रो पर्यावरण संवर्धनाकडे सुरुवातीपासूनच सतर्क आहे. झाडांचे पुनर्रोपण, नवीन झाडांची लागवड , सौरऊर्जेचा वापर, बायोडायजेस्टर व IGBC ग्रीन बिल्डिंगच्या धर्तीवर स्टेशनची उभारणी अश्या अनेक पर्यावरण संवर्धक उपाययोजना महामेट्रो राबवत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी अधिक सुसूत्रता आणण्यासाठी महामेट्रोने ISO 14001 : 2015 प्रमाणपत्रांसाठी अर्ज केला होता. त्याचेही प्रमाणपत्र महामेट्रोला प्राप्त झाले आहे.

पुणे शहराच्या 31 किलोमीटर मार्गावर महामेट्रोचे काम प्रगतीपथावर साधारणतः असून 6 हजार 500 कामगार महामेट्रोच्या विविध ठिकाणी काम करत आहेत. महामेट्रोचे सुरक्षा विभाग कामगारांची सुरक्षितता आणि आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी सतत कार्यरत असते. कामगारांना हेल्मेट , सुरक्षा जॅकेट, सेफ्टी बेल्ट इत्यादी वैयक्तिक सुरक्षा साधने दिली जात आहेत. कामगारांच्या लेबर कॅम्प मध्ये डॉक्टरांमार्फत नियमित कामगारांची तपासणी केली जाते.

या व्यतिरिक्त महामेट्रोचे सुरक्षा विभाग कामगारांना विविध कार्यक्रमाद्वारे सुरक्षा , अग्नी सुरक्षा , उंच जागेवर काम करण्यासाठी आवश्यक असणारी खबरदारी, प्राथमिक आरोग्य सुविधा (फर्स्ट एड) इत्यादी विषयी प्रशिक्षण आयोजित केले जाते. कामगारांच्या आरोग्य विषयक व सुरक्षाविषयक कामांमध्ये अनेक सुसूत्रता व नियमितपण आणण्यासाठी महामेट्रोने ISO – 45001: 2015 प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्याबाबतचेही प्रमाणपत्र महामेट्रोला मिळाले आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, “महामेट्रो गुणवत्तापूर्वक कार्य करत आली आहे. आणि या तीन ISO प्रमाणपत्रामुळे महामेट्रोची गुणवत्ताप्रणाली अधोरेखित झाली आहे. महामेट्रोला गुणवत्ता मध्ये अधिक सुसूत्रता आणि नियमितपणा आणण्यासाठी ISO प्रमाणपत्राचा निश्चित फायदा होणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.