Pune News : सुका कचरा दिवसाआड उचलणार, पुणे महापालिकेचा निर्णय

एमपीसी न्यूज – पुणे शहरात सुका कचरा आता दिवसाआड उचलण्यात येणार आहे, तशा प्रकारचा निर्णय महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. सोमवारपासून (२१ सप्टेंबर) या निर्णयाची अंमलबजाणी सुरू झाली आहे. ओला कचरा दैनंदिन स्वरूपात संकलित केला जाणार आहे. तर, ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गतही कचरा वर्गीकरण करणे बंधनकारक आहे. पुण्यातील कचरा वर्गीकरणाचे प्रमाण 70 ते 80 टक्के असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार क्षेत्रीय कार्यालयाला देण्यात आले आहेत. मिश्र स्वरूपाचा कचरा देणाऱ्या नागरिकांना पहिल्या वेळी 60 रुपये, दुसऱ्या वेळी 120 रुपये तर त्यापुढील प्रत्येक वेळी 180 रुपये दंड आकारला जाणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुण्यात दिवसाला सुमारे 2 हजार 200 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. कचरा वर्गीकरण होत नसल्यास अनुदान देण्यात येणार नाही, असा इशारा केंद्र सरकारतर्फे पुणे महापालिकेला देण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेतर्फेही सोसायट्यांना, हॉटेल, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट यांनी ओला कचरा आपल्याच परिसरात जिरविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कचरा वर्गीकरण 100 टक्के झाले पाहिजे, यासाठी पुणे महापालिकेतर्फे प्रयत्न करण्यात येत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. तर, महापालिकेतर्फे दिवसाआड सुका कचरा उचलण्यात येणार असल्याने पुणेकरांची ऐनवेळी तारांबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.