Pune News : पुणे महापालिकेकडून कोरोना रुग्णांसाठी शहरात 101 मोफत रुग्णवाहिका उपलब्ध 

एमपीसी न्यूज :  पुणे महापालिकेने रुग्णवाहिकांची गरज लक्षत घेऊन 101 रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे. यापैकी 56 रुग्णवाहिका चोवीस तास कार्यरत राहणार असून ही सेवा पालिकेकडून विनामुल्य पुरवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 

शहरात दिवसाला साडेपाच ते सहा हजार नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. दुसरीकडे गंभीर रुग्णांचीही संख्या वाढत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बेड आणि रुग्णवाहिका मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

_MPC_DIR_MPU_II

या पार्श्वभूमीवर पालिकेने आयसोलेशन, कोविड केअर सेंटर, रुग्णालयांमधील रुग्णांसाठी रुग्णवाहिका आणि मृत व्यक्तींच्या मृतदेहासाठी शववाहिका पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महापालिकेकडे असलेल्या 46 रुग्णवाहिका कमी पडत असल्याने आणखी 55 रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे 101 रुग्णवाहिका शहरातील रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापैकी 23 वाहने शववाहिका म्हणून तर 78 वाहने रुग्णवाहिका म्हणून काम करणार आहेत. यामध्ये 63 रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था असून कोरोना नसलेल्या रुग्णांसाठी 11 रुग्णवाहिका निश्चित करण्यात आल्या आहेत. यापैकी 56 रुग्णवाहिका चोवीस तास कार्यरत राहणार आहे. ही सर्व सुविधा विनामुल्य असून नागरिकांनी रुग्णवाहिका मिळण्यासाठी 9689939381 या किंवा शासनाच्या 108 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, नागरिकांनी प्रथम बेड उपलब्धतेबाबत खातरजमा करावी, आणि मगच रुग्णवाहिकेची मागणी करावी. कोरोनाबाधित मृत व्यक्तींसाठी शववाहिका उपलब्ध होण्यासाठी पीएमपीएमएल येथे नियंत्रण कक्ष व नियोजन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.