Pune News : पुणे महापालिकेची थेट कंपनीकडूनच 3 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनची खरेदी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या रुग्णालयांसाठी महापालिकेने थेट कंपनीकडूनच रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदी केली आहेत. पहिल्या टप्प्यात 800 इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. आणखी 3 हजार इंजेक्शन पुढच्या टप्प्यात येणार आहेत.

महापालिकेच्या जम्बो, नायडू, दळवी, बाणेर, लायगुडे या रुग्णालयांमध्ये रोज किमान 200 रेमडेसिव्हिरची आवश्‍यकता आहे, पण सरकारकडून दोन दिवसांसाठी एवढा साठा मिळत आहे. पालिकेला पुरेशा प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध व्हावेत अशी वारंवार मागणी करण्यात आली पण इंजेक्शन न मिळाल्याने अडचणी येत होत्या. त्यामुळे पालिकेने थेट कंपन्यांशी संपर्क साधून 800 इंजेक्शन मिळवले आहेत.

पुढे ज्युबिलियन या कंपनीकडून आणखी तीन हजार इंजेक्शन या आठवड्यात प्राप्त होतील. त्यामुळे रुग्णांना या इंजेक्शनचा तुटवडा यापुढे भासणार नाही, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

महापालिका शहरातील कोरोना बाधितांना आवश्यक असल्यास मोफत रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे़. त्यासाठी 25 हजार इंजेक्शन मिळविण्यासाठी कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. त्यासाठी कंपन्यांना आगाऊ पैसे देण्याचीही तयारी केली आहे, असे रासने यांनी सांगितले.

”खासगी रुग्णालयातील रुग्णांनाही इंजेक्शन मिळत नाहीत, त्यामुळे त्यांनाही मोफत इंजेक्शन दिले जातील. ज्या कोरोनाबाधित रुग्णाची ऑक्सिजन पातळी 93 पेक्षा कमी व ‘एचआरसीटी’ स्कोर 10 च्या पुढे असेल अशा रुग्णांनाच ही मदत मिळेल.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.