Pune News : नागपूरच्या धर्तीवर पुणे महापालिकाही पाणी विकून होणार ‘श्रीमंत’ ?

एमपीसी न्यूज : नागपूर महापालिका सांडपाणी मिश्रीत पाण्यावर प्रक्रिया करून औद्योगिक कंपन्यांना विकून वर्षाला 350 कोटी रुपये उत्पन्न मिळवित आहेत. त्याच धर्तीवर जायका प्रकल्पांतील पाणी विकून पुणे महापालिका देखील नवीन आर्थिक स्त्रोतातून उत्पन्न वाढवू शकणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली मुळा मुठा नदी सुधार योजने अंतर्गत सुमारे 1800 कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या जायका कंपनीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पा संदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर महापालिकेचे सांडपाणी आणि अन्य पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना विकून 350 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवित असल्याचे मंत्री गडकरी यांनी आवर्जून सांगितले.

पाण्याची कमतरता लक्षात घेऊनच केंद्र व राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेत औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना प्रक्रिया केलेले पाणीच विकत घेण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेच्या धर्तीवर आगामी काळात पुणे महापालिका देखील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुणे शहराच्या चारही दिशेला असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांना विकून शेकडो कोटी रुपयांचे उत्पन्न उभारू शकते असा विश्वास मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला आहे. यावर पुुणे महापालिकेचे सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे जायका प्रकल्पांना गती मिळणार आहे.

तब्बल 10 टीएमसी इतक्या पाण्यावर प्रक्रिया करणारे जायकाचे जलशुद्धीकरण प्रकल्प हे बहुतांश प्रकल्प नदीपात्रात होणार असल्यामुळे ब्लू लाईन, रेड लाईनमध्ये प्रकल्प उभारणीला पर्यावरण विभागासह राष्ट्रीय हरीत न्याय प्राधिकरणच्या (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल – एनजीटी) उच्च पदस्थांनी हिरवा कंदील दाखविल्याची माहिती पुणे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.