Pune News : पुणे महापालिकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात !

महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती ; विविध विभागाकडून मदत पथके रवाना

एमपीसीन्यूज : राज्यातील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनेही विविध विभागातील पथके कोल्हापूर, मिरज, कुपवाड, रायगड याठिकाणी मदतीसाठी पाठवली आहेत. कोल्हापूरसाठी पिण्याच्या पाण्याच्या 17 टँकरचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे मिरज, कुपवाड महानगरपालिका येथे आपत्ती व्यवस्थपान अंतर्गत मदतीसाठी दोन जेटिंग मशीन पुणे महानगरपालिका पाठवीत आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महापौर मोहोळ पुढे म्हणाले, ‘कोल्हापूरमध्ये जलशुद्धीकरणाचे काही केंद्रे बंद आहेत. पंपिंग स्टेशनमध्ये पाणी साचल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी पोहोचवणे आव्हानात्मक आहे. त्यात कोल्हापूर महानगरपालिकेकडील टँकर संख्या अपुरी असल्याने अडचण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाचे 17 टँकर कोल्हापूरला रवाना करण्यात आले. टँकर्ससोबतच निरीक्षक, इलेक्ट्रिशियन असे एकूण 21 जण कोल्हापूरला रवाना झाले आहेत’.

‘रायगड येथे झालेल्या महापुरानंतर लोकांच्या आरोग्याचा विचार करून पुणे महानगरपालिकेची 15 जणांची आरोग्य टीम रायगडकडे रवाना झाली आहे. यात 7 डॉक्टर्स आणि 8 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.साधारण एक आठवड्याच्या कालावधीसाठी ही टीम पूरग्रस्तांच्या आरोग्य सेवेत असणार आहे. पूरग्रस्तांना आधार देताना, त्यांना मदत करत असताना त्यात पुणेकरांचाही खारीचा वाटा असावा, ही आपली भावना आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.