Pune News : पुणेकरांनी जानेवारीत अनुभवला हिवसाळा!

एमपीसी न्यूज : अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीवर चक्राकार वारे वाहत असल्यामुळे येत्या 48 तासात कोकण किनारपट्टी, मुंबई, पुण्यासह संपुर्ण महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

मध्यवर्ती पेठांसह शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे लष्कर, गणेशखिंड रस्ता परिसरात दुपारी 1 वाजल्यापासून सुरवातीला हलक्या सरी त्यानंतर मात्र जोरदार पावसाने हजेरी लावली. येत्या 48 तासात पुन्हा मध्यम व हलक्या सरी कोसळण्याची शक्यता पुणे वेध शाळेकडून वर्तविण्यात आली आहे.

पुणे शहर आणि उपनगरातील वातावरण मागील दोन दिवसापासून ढगाळ होते. त्यामुळे काल देखील शहरातील काही भागात सायंकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. मात्र दुपारी 1 वाजल्यानंतर जोरदार पाऊस पडला. सायंकाळी 4 वाजेपर्यंत रस्ते जलमय झाले.

बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, मनपा भवन बसस्थानक, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, शास्त्री रस्ता, सिंहगड रस्ता, पुणे सातारा रस्ता, पुणे लष्कर परिसरात जोरदार पाऊस पडला.

शहरातील काही ठिकाणी सखल भागात पाणी साठल्यामुळे गुडघाभर पाणी साठले होते. फेरीवाले, दुचाकी वाहनांची रहदारी काही काळ बंद होती. धुके आणि पावसामुळे दृश्यता अंधूक झाली होती. काही ठिकाणी सिग्नल बंद असल्यामुळे पुण्यात वाहतूक संथ गतीने सुरू होती. एकूणच पुणेकरांनी जानेवारीमध्ये हिवसाळा अनुभवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.