Pune News : प्लाझ्मा दान करण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे- महापौर मुरलीधर मोहोळ

महापौर करणार प्लाझ्मा दान

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित रुग्णांचा शहरातील मृत्युदर 2.40 टक्के इतका असून हे प्रमाण अजून खाली आणायचे आहे. त्यासाठी शहरामधील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे यावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना केले. महापौर मोहोळ यांनी स्वतः प्लाझ्मादानासाठी  रक्ताचे नमुने देत पुणेकरांना आवाहन केले आहे.

पुणे महापालिकेच्या कोरोनामुक्त झालेल्या 210 व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र असून यात पहिला नमुना महापौर मोहोळ यांनी दिला. त्यावेळी ते बोलत होते.

विभागीय आयुक्त सौरभ राव, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक आदित्य माळवे,अविनाश बागवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हकारे, डॉ. नलिनी काहगी, ससून रक्तपेढी विभागप्रमुख, डॉ. शंकर मुगावे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, आतापार्यंत 750 कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करण्याकरिता पुढे आल्या आहेत. शहरात 80 हजारांपेक्षा जास्त कोरोनामुक्त असून प्लाझ्मा दान करण्यासाठी जास्तीत जास्त जणांनी पुढे यायला हवे.

शहराचा मृत्युदर 2.40% इतका असून हा दर बऱ्याच प्रमाणात खाली आणायचा आहे. त्याकरिता प्लाझ्मा दान ही संकल्पना व्यापक करण्यात आपण लवकरच विशेष मोहीम राबवत आहोत.

याप्रसंगी डॉ. नलिनी काडगी, ससून रक्तपेढी विभागप्रमुख यांनी प्लाझ्मा दानाविषयी माहिती दिली. त्या समवेत डॉ. शंकर मुगावे, समाजसेवा अधिक्षक तथा प्लाज्मा समन्वयक ससून हे उपस्थित होते.

याप्रसंगी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. रामचंद्र हकारे यांनी आभार  मानले.  सुरेश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी हे कोरोनाविरुध्द आजपर्यंत लढत आहेत. कोरोनाच्या या लढाईमध्ये प्लाझ्मा दान हे एक सकारात्मक पाऊल आहे. पुणे मनपाचे पदाधिकारी व अधिकारी या प्लाइमा दानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करतील यात काही शंकाच नाही’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.