Pune News : पुणेकरांना घर बसल्या घेता येणार शहरी गरीब योजनेचा लाभ

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांसाठी लागू करण्यात आलेली शहरी गरीब योजना आता ऑनलाइन करण्यात आली आहे. यामुळे आता पात्र नागरिकांनी त्यांची कागदपत्रे संबंधित रुग्णालयांकडे सादर केल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

पालिकेच्या हद्दीतील नागरिकांसाठी महापालिकेने शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ झोपडपट्टीमध्ये राहणारे, दारिद्रयरेषेखालील पिवळे रेशनकार्ड धारक, वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असणार्‍या नागरिकांना घेता येतो. या योजेनसाठी केवळ दोनशे रुपये शुल्क आकारले जाते. एका कुटुंबासाठी एका वर्षासाठी एक लाख रुपयांची मदत केली जाते.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासाठी महापालिकेत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे, हे लक्षात घेऊन ही योजना ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या नागरिकांनी आवश्यक असलेली कागदपत्रे संबंधित रुग्णालयात जमा करायची आहेत. ही कागदपत्रे स्कॅन करून रुग्णालयाकडून महापालिकेला पाठविली जाणार आहेत. त्यानुसार लाभार्थीचे योजनेचे कार्ड तयार करून रुग्णालयाला पाठविले जाणार आहे. त्यानंतर संबंधित रुग्णाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे आता योजनासाठी कार्ड तयार करणे, ते रुग्णालयात देणे अशा कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.