Pune News : पुणे विद्यापीठाची ‘ऑक्सि पार्क योजना’ स्थगित

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक संकुलात ‘ऑक्सि पार्क योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विद्यापीठात व्यायाम व विहारासाठी येणाऱ्यांकडून मासिक शुल्क घेतले जाणार आहे. या योजनेची सुरुवात आंतरराष्ट्रीय योग दिनी केली जाणार होती. मात्र, या योजनेला विद्यापीठाने तुर्तास स्थगिती दिली आहे.

पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी शुक्रवारी (दि.11) एक परिपत्रक काढून ‘ऑक्सि पार्क योजना’ स्थगित केल्याचे सांगितले. या योजनेत क्रीडा व इतर सुविधा समाविष्ट करून योजना सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे, पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, विद्यापीठाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हातभार लागावा, तसेच विद्यापीठात ये-जा करणाऱ्यांवर लक्ष राहण्याच्या दृष्टीने विद्यापीठात ‘ऑक्सि पार्क योजना’ राबविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार मासिक पाससाठी सहाशे, सहामाही पाससाठी साडेपाच हजार, तसेच वार्षिक पाससाठी दहा हजार रुपये आकारण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

या शुल्कातून वैद्यकीय व रुग्णवाहिका सुविधा, जयकर ग्रंथालयाचे सदस्यत्व, ओपन जिम, वार्षिक संमेलन आदींचा लाभ घेता येईल. विद्यापीठाच्या क्रीडा व व्यायाम सुविधेतही सवलत मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.