Pune News : पुणेकर म्हणतात घरी राहून बरे होऊ ! 50 हजार पुणेकर घेतायेत घरीच कोरोनावर उपचार

एमपीसी न्यूज : शहरात जवळपास 53 हजार 326 कोरोनाचे सक्रीय रुग्ण असून त्यापैकी जवळपास 50 हजार रुग्ण गृह विलीगिकरणात आहेत. या रुग्णांची आरोग्यविषयक विचारपूस करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कॉल सेंटर कार्यान्वीत असून रुग्णांनी घराबाहेर न पडता स्वतःची व समाजाची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला साडेपाच ते सहा हजाराच्या घरात रुग्ण आढळून येत आहेत. दिवसाला सरासरी 22 ते 25 हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्या वाढल्याने शहरातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. आजमितीला शहरात 53 हजार 326 कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.

महापालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांसोबत शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र. त्यांच्या घरामध्ये स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, असे जवळपास 50 हजारपेक्षा अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

महापालिकेच्या कोविड चाचणी केंद्रावर तपासणी केलेल्यांची सर्व माहिती महापालिकेकडे असते. मात्र शासकीय केंद्रांपेक्षा खासगी लॅबमध्ये 80 टक्के चाचण्या होतात.

_MPC_DIR_MPU_II

अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर खासगी लॅबकडून रुग्णाची सर्व माहिती महापालिकेला पाठवली जाते. होम आयसोलेशनचा पर्याय निवडलेल्या रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी महापालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कॉल सेंटरची व्यवस्था केली आहे. याशिवाय रुग्णाच्या हातावर शिक्के मारणे, त्यांच्या घराच्या दरवाजावर कोविड-19 चे स्टिकर चिटकविणे, तसेच संबंधित रुग्णाच्या सोसायटी बाहेर बोर्ड लावणे, सोसायटी चेअरमन यांना त्यांना बाहेर पडू न देण्याच्या सूचित करणे आदी उपायही महापालिकेकडून केले जातात.

याशिवाय महापालिकेने सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या आणि घरामध्ये वेगळे राहण्याची व्यवस्था नसलेल्या रुग्णांसाठी शहरात विविध 9 ठिकाणी कोविड केअर सेंटर कार्यान्वीत ठेवली आहेत.

मात्र, होम आयसोलेशनमधील अनेक रुग्ण एक दोन दिवस घरात थांबल्यानंतर विलगीकरणाचा कालावधी संपण्यापूर्वीच घराबाहेर पडताना दिसतात. यामुळे त्यांच्या पासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पालिकेने आयसोलेशन कालावधी संपण्यापूर्वी घराबाहेर पडणार्‍यांवर पोलिस कारवाई करण्याचा ईशाराही दिला आहे. मात्र, त्यात काही सुधारणा झाल्याचे चित्र पहायला मिळत नाही.

महापालिका अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल
शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून महापालिका विविध उपाययोजना करत आहे. होम आयसोलेशनमधील जे रुग्ण घराबाहेर पडतात, त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र कारवाई करणे हा पर्याय असून शकत नाही. त्यामुळे होम आयसोलेशनमधील रुग्णांनी घराबाहेर न पडता स्वतःची व समाजाची काळजी घ्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.