Pune News : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत पुणेकर राज्यात अव्वल

एमपीसी न्यूज – पुणेकर वीजग्राहकांनी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर टाळत महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये राज्यात आघाडी घेतली आहे. महावितरणचे राज्यभरातील 1,79,587 ग्राहक ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाले आहेत. यामध्ये पुणे परिमंडलातील सर्वाधिक 43 हजार 974 वीजग्राहकांचा समावेश आहे. त्यानंतर कल्याण परिमंडल 18 हजार 634 तर, भांडूप परिमंडलातील 18 हजार 089 ग्राहकांचा समावेश आहे.

गेल्या सात महिन्यांत ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणे परिमंडलात तब्बल 18 हजार 999 ग्राहकांची वाढ झाली आहे. याच कालावधीत एकूण 16 परिमंडलांमध्ये ‘गो-ग्रीन’ योजनेत 75 हजार 669 ग्राहकांची संख्या वाढलेली आहे. त्यात पुणेकरांचा वाटा देखील सर्वाधिक आहे. महावितरणची पर्यावरणपुरक ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज असून जास्तीत जास्त ग्राहकांनी कागदविरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी केले आहे.

महावितरणकडून ‘गो-ग्रीन’ योजनेत छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होणार आहे.

वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ‘ई-मेल’ तसेच ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल प्राप्त होणार असल्याने ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटसह ते तात्काळ ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल.

सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील 11 महिन्यांचे असे एकूण 12 महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळस्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरातील 24 हजार 696 तर पिंपरी चिंचवड शहरातील 12 हजार 779 तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, हवेली व वेल्हे तालुक्यातील 6 हजार 499 ग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ला पसंती दिली आहे व पर्यावरणपुरक कामात योगदान दिले आहे.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या 15 अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरणपुरक योजनेमध्ये योगदान द्यावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.