Pune News : पुणेकरांनो स्वेटर शोधून ठेवा…थंडीचा कडाका वाढणार आहे!

एमपीसी न्यूज : येत्या 2 दिवसांमध्ये राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. विशेषतः मुंबई आणि पुणे आसपासच्या परिसरात तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये गारठा वाढल्याने याचा राज्यातील हवामानावर परिणाम होणार आहे. मुंबईसोबतच पुण्यातही नागरिकांना पुढील दोन दिवसात कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.

उत्तर भारतात काही ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान , हरियाणा या भागात तापमानाचा पारा खाली आला आहे.

यातच राज्यात सध्या हवामान कोरडे असून पुढील एक आठवडा ते कोरडेच राहाणार असल्याचे हवामान शास्त्र विभागाच्या संकेतस्थळावरुन स्पष्ट होते. याचाच परिणाम राज्यातील अनेक भागात झाला असून थंडीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता बहुतेक ठिकाणी आकाश निरभ्र असून थंडीचा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी म्हणजेच 20 डिसेंबरला पुण्यात किमान तापमान 13.3 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 29 अंश सेल्सियस राहाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे, अतिवृष्टी, उकाडा याचा सामना करणाऱ्या पुणे आणि मुंबईकरांना आता कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.