Pune News : मोक्का लावा,पॉवरफुल वकील नेमा पण कोयता गॅंगची दहशत संपवाच – चंद्रकांत पाटलांच्या पुणे पोलिसांना सूचना

एमपीसी न्यूज -मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगची दहशत सुरू असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहे. हातात कोयते घेऊन सराईत गुन्हेगार खुलेआम फिरताना दिसत आहेत. पुण्यात दहशत पसरवणाऱ्या या कोयता गॅंगची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रजनीश शेठी यांनी देखील घेतली होती. त्यानंतर आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील पुणे पोलिसांना कोयता गॅंगवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या (Pune News ) आहेत. पोलिसांनी पावरफुल वकील नेमावे, 50 ते 60 मोक्का लावावेत आणि कोयता यांची दहशत कमी करावी असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, हातात कोयता घेऊन दहशत पसरवणारे आठ ते नऊ ग्रुप पकडून त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कायद्याचा धाक निर्माण झाल्याशिवाय कायद्याची अंमलबजावणी होत नाही. त्यासाठी कडक कारवाई करण्याची सूचना पोलिसांना दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना जे योग्य वाटतं ते करण्याची मुभा दिली आहे. पोलिसांच्या कामात कोणतेही राजकारणी हस्तक्षेप करणार नाहीत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी सुद्धा आता कारवाई करण्याचा धडाका लावला आहे.

सध्या पुण्यात जे काही सुरू आहे ती भुरटेगिरी सुरू आहे. लोकांनी सुद्धा या दहशतीला बळी पडू नये. दहशत पसरविणाऱ्यांना इझी मनीची सवय लागली आहे. मात्र इथून पुढे हे चालणार नाही. कोयता घेऊन दहशत पसरवणारा एकही गुन्हेगार सुटणार नाही. सगळ्यांना मोक्का लागेल. ज्यावेळेला 40-50 जणांना मोक्का लागेल, आयुष्य बरबाद होईल, तेव्हा इतरांना धडा मिळेल, असेही चंद्रकांत पाटील (Pune News ) म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.