Pune News : कोविड रुग्णांवर शासकीय रुग्णालयांत दर्जेदार उपचार : संदीप खर्डेकर

गत 25 दिवसात तब्बल 200 कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णासाठी विशिष्ट रुग्णालयाच्या आग्रहाने हैराण केले. 

एमपीसी न्यूज – नागरिकांनी विशिष्ट रुग्णालयांचा आग्रह सोडावा. शासकीय रुग्णालयांत उत्तम उपचार होतात, तर पंचतारांकित रुग्णालयांच्या आग्रहाने रुग्णांची ससेहोलपट होत असल्याचे क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

ऑगस्ट महिन्यातील गत 25 दिवसात तब्बल 200 कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णासाठी विशिष्ट रुग्णालयाच्या आग्रहाने हैराण केले.  असे विनंतीचे असंख्य फोन किंवा तुमची ओळख आहे ( वशिला ) तर मिळवून द्या बेड अशा आर्जवांनी हे दिवस व्यस्त आणि अस्वस्थ करून गेले.

बहुतांश नातेवाईक चांगले रुग्णालय मिळावे म्हणून एक दोन दिवस थांबायलाही तयार असायचे यात रुग्णाच्या प्रकृतीची चिंता वाटली. प्रथितयश रुग्णालयात संपर्क केल्यावर आयसीयु किंवा व्हेंटिलेटर असलेले बेड शिल्लक नाहीत, रुग्णाचे नाव नंबर पाठवा, बेड रिकामे झाले की लगेच कळवितो, असे उत्तर मिळाले.

_MPC_DIR_MPU_II

तर काही ठिकाणी जनरल वॉर्डमधे जागा आहे, पण रुग्णाचे नातेवाईक प्रायव्हेट रुम मागत असल्याने अडचण होत असल्याचेही निदर्शनास आले. बेड मिळत नाहीत, हॉस्पिटल फुल्ल आहेत, याचा मागोवा घेतला असता नागरिकांच्या विशिष्ट रुग्णालयात दाखल होण्याच्या आग्रही भूमिकेमुळे हे चित्र निर्माण झाल्याचे लक्षात येत असल्याचे खर्डेकर म्हणाले.

नागरिकांनी उपलब्ध रुग्णालयात दाखल व्हावे, आता तर जंबो रुग्णालय ही कार्यान्वित झाले असून पुरेसे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. नागरिकांनी शासकीय रुग्णालय व मनपाच्या यंत्रणेवर विश्वास ठेवावा. दुराग्रह सोडावा, असे आवाहनही संदीप खर्डेकर यांनी केले आहे.

माझ्या संपर्कातील तब्बल 1200 रुग्ण मनपाच्या उपचाराने बरे झाले असून त्यांच्या पूर्वीप्रमाणेच दिनक्रमाला ही सुरुवात झाली आहे. कोविड योद्धा असणाऱ्या शासकीय सेवेतील डॉक्टर, कंपाउंडर, नर्सिंग स्टॉफ यांच्यावर विश्वास दाखवून कोरोना संकटाच्या सक्षम प्रतिकारास साहाय्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like