Pune News : महाराष्ट्रात राहून ‘मराठी’ न येणार्‍या जावेद अख्तरांना मराठी साहित्य संमेलनात पायघड्या कशासाठी; हिंदु जनजागृती समितीचा सवाल

एमपीसी न्यूज – नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून सिनेसृष्टीतील प्रख्यात गीतकार तथा पटकथा लेखक जावेद अख्तर यांचे नाव निश्चित झाले आहे. मात्र, जावेद अख्तर यांच्या उपस्थितीला हिंदु जनजागृती समितीने विरोध दर्शवला आहे. 50 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रात राहून ‘मराठी’ न येणार्‍या जावेद अख्तर यांना मराठी साहित्य संमेलनात पायघड्या कशासाठी ? मराठी साहित्यात त्यांचे योगदान काय, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या मते अख्तर यांचे मराठी साहित्यात काहीही योगदान नाही. त्यामुळे अशा व्यक्तीला साहित्य संमेलनाच्या उद्घाटनास बोलावणे हा मराठी साहित्यिकांचा अवमान ठरेल. 50 वर्षे महाराष्ट्रात राहून देखील एवढ्या वर्षांत मराठी भाषा न शिकता उर्दू-हिंदी भाषेतूनच काम करत आहेत त्यामुळे त्यांना उद्घाटक म्हणून बोलावू नये, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीने घेतली आहे. याअगोदर ब्राह्मण महासंघातर्फे देखील त्यांना विरोध दर्शविला होता.

नाशिक येथे 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. नाशिक येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर, मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो उपस्थित रहाणार आहेत. समारोपाच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित राहतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.