Pune News : राज ठाकरे सोमवारपासून तीन दिवसांच्या पुणे दौर्‍यावर

एमपीसीन्यूज : आगामी 2022  मध्ये होणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 19  ते 21 जुलै असे तीन दिवस पुणे दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यादरम्यान शहरातील पक्षाच्या आजी माजी पदाधिकारी यांच्याबरोबर पक्षबांधणी व आगामी निवडणुका या विषयावर संवाद आणि प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन करणार आहेत.

पदाधिकाऱ्यांशी ‘राज संवाद’ उपक्रमा अंतर्गत राज ठाकरे हे संवाद साधणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, उपाध्यक्ष रणजीत शिरोळे, ॲड. गणेश सातपुते उपस्थित होते

पुणे शहराच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर राज ठाकरे येत असून राज संवाद उपक्रमा अंतर्गत, सोमवारी 19  जुलै रोजी सकाळी 10 ते 1  वेळेत वडगाव शेरी आणि शिवाजीनगर मतदारसंघाची सेनापती बापट रोडवरील, इंद्रप्रस्थ कार्यालय येथे बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 ते 4 वेळेत कोथरूड आणि खडकवासला माणिक बाग पेट्रोल पंपा समोरील, परिणय मंगल कार्यालयात होणार आहे.

तर दुसर्‍या दिवशी मंगळवारी 20 जुलै रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत हडपसर आणि कॅन्टोन्मेंट विभागाची कोंढवा खुर्द येथील लोणकर लान्स येथे बैठक होणार असून, 1 ते 4 दरम्यान कसबा आणि पर्वती विभागाची बिबवेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक होणार आहे, अशी माहिती वागसकर यांनी दिली

दोन दिवसात शहरातील चारही भागात राज ठाकरे बैठका घेणार आहेत. त्या दरम्यान प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेणार असल्याने, पुढील निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे मानले जात आहे. दौऱ्याच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच बुधवारी कोरोना काळात ज्या सामाजिक संस्थांनी चांगले काम केले, त्यांच्याशी श्री ठाकरे संवाद साधून त्यांना सन्मानित करणार असल्याचे वागसकर यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.