Pune News : राजेंद्र पाटे झाले ‘नरेडको’चे पहिले अध्यक्ष

एमपीसी न्यूज – नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) कडून आज पुणे शहराच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटे (वाणी) यांची निवड करण्यात आली. केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी व महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी तसेच क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर व इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थितीत होते. यावेळी उपस्थित केंद्रीय गृह निर्माण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी मुद्रांक शुल्क 50 टक्क्यांपर्यंत कमी केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले आणि इतर राज्यांनीही या पद्धतीने सूट जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्व देशभरात कोविडनंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सर्वात जास्त रोजगारनिर्मिती करणा-या बांधकाम उद्योगास चालना देणेची आवश्यकता असल्याचे सांगितले. याचबरोबर त्यांनी नरेडकोच्या पदाधिका-यांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी नरेडकोचे नवनिर्वाचीत अध्यक्ष राजेंद्र पाटे (वाणी) म्हणाले की कोविड -19 चा प्रसार हा सर्वात जास्त झोपडपट्ट्यांमध्ये झाल्यामुळे लवकरात लवकर पुणे शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून स्वच्छ आणि सुरक्षित पुण्याच्या विकासावर जोर देण्यासाठी नरेडको प्रयत्नशील राहील.

तसेच पुण्याच्या विकासामध्ये शहरातील मेट्रो, रिंगरोड आणि नदीसुधार योजना यामध्ये नरेडकोच्या माध्यमातून लक्ष घालून काम गतिमान करण्याचे ठरविले आहे. याचवेळी सदर कार्यक्रमामध्ये नियोजित अध्यक्ष अतुल गोयल, मुकेश येवले (उपाध्यक्ष) भरत अगरवाल (उपाध्यक्ष), अभय केले (सचिव) यांची नेमणूक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.