Pune News : जुन्या सोसायट्यांचा पुनर्विकास मार्गी!

एमपीसी न्यूज : सहा मीटर आणि त्यावरील रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याबाबत राज्य सरकारने महापालिकेतील महाविकास आघाडीच्या नेत्यांना चपराक दिली असल्याचे ‘युनिफाईड डीसी रूल’वरून समोर आले. या रस्त्यांचे रुंदीकरण करून टीडीआर वापरण्यास परवानगी देण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने घेतली भूमिका अखेर राज्य सरकारने मान्य केली आहे. यामुळे राजकीय श्रेय घेण्यावरून थांबलेल्या शहरातील जुन्या सोसायट्यांचा पुनर्विकास मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीला (युनिफाईड डीसी रूल) राज्य सरकारकडून यापूर्वीच मान्यता दिली होती.

मात्र, आज त्याबाबतचे आदेश सरकारकडून लागू करण्यात आले. सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर अथवा प्रिमिअम एफएसआय वापरून बांधकामास परवानगी देण्यासंदर्भात कोणतीही तरतूद या नियमावलीत केलेली नाही. परंतु मुंबई महापालिका कायद्यातील 210 कलमानुसार सहा मीटर रस्त्यांचे रुंदीकरण करून मगच टीडीआर अथवा प्रिमिअम एफएसआय वापरण्यास परवानगी देण्याची तरतूद केली आहे.

शहरातील सहा मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवर टीडीआर वापरून बांधकाम करण्यास परवानगी नाही. त्यामुळे अनेक जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. पूर्वीप्रमाणे सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर देखील टीडीआर वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यावर महापालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात तीनशेहून अधिक रस्त्यांचे कलम 210 खाली रुंदीकरण करून ते नऊ मीटर रुंदीचे दर्शवून त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्यासंदर्भातील प्रस्तावास स्थायी समिती समोर मांडला होता. त्यास समितीने मान्यताही दिली होती.

परंतु महापालिकेतील विरोधी पक्षांनी त्यावर आक्षेप शहरातील सर्वच सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी द्यावी, असा आग्रह पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे धरला होता. त्यानंतर पवार यांनी समितीने घेतलेल्या या निर्णयाला स्थगिती दिली. तसेच शहरातील सर्वच सहा मीटर व त्यापुढील रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याबाबतचे आदेश काढण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यासाठी राज्य सरकारकडून तयार करण्यात येत असलेल्या ‘युनिफाईड डीसी रूल’मध्ये तशी तरतूद करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले होते.

प्रत्यक्षात स्थायी समितीच्या आदेशाला स्थगिती दिल्याचे पत्र अद्याप महापालिकेला आलेले नाही. ‘युनिफाईड डीसी रूल’मध्ये देखील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर टीडीआर वापर करण्यास अथवा प्रिमिअम शुल्क भरून वाढीव एफएसआय वापरण्यास परवानगी दिली नाही. परंतु मुंबई महापालिका कायद्यातील तरतुदींचा वापर सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांचे दोन्ही बाजूने दीड-दीड मीटर रुंदीकरण करावे अन्‌ मगच टीडीआर अथवा प्रिमिअम एफएसआय वापरण्यास परवानगी द्यावी, अशी तरतूद केली आहे. त्यामुळे महापालिकेने घेतलेला निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारकडून दिलासा देण्याचा प्रयत्न
सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास बंदी कायम ठेवताना दुसरीकडे सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. नऊ ते बारा मीटर रुंदीच्या रस्त्यांवर मान्य एफएसआय व्यतिरिक्त प्रिमिअम शुल्क आकारून येणाऱ्या एफएसआयमध्ये वाढ केली आहे. नव्या नियमानुसार 0.3 ऐवजी 0.5 टक्कांपर्यंत वाढीव प्रिमिअम एफएसआय वापरता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.