Pune News : प्रभाग रचना आमच्या हातात लक्षात ठेवा : अजित पवार

अजित पवारांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीत उत्साह

एमपीसी न्यूज : गत महापालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रभाग रचना करतेवेळी भाजपाने सत्तेचा गैरवापर केला. पण आता आम्ही सत्तेत आहोत प्रभाग रचना आमच्या हातात आहे लक्षात ठेवा, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या आजी माजी नगरसेवकांमध्ये उत्साह निर्माण झाले आहे.

गत महापालिकेच्या वेळेस भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेत होती. त्यावेळी चार सदस्यीय प्रभाग रचना अंमलात आणली. तसेच पुर्वीचे वॉर्ड फोडून सोयीनुसार प्रभाग रचना केल्या. परिणामी पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील महापालिकांवर झेंडा फडकावित निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांसह शिवसेनेची वाताहत झाली होती. काही महापालिकांमध्ये दोन आकडी संख्या गाठणे देखील शक्य झाले नाही.

राज्यात शिवसेनेसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून पुन्हा वॉर्ड पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या दोन वर्षांवर महापालिका निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभुमीवर अजित पवार यांनी रविवारी (दि.22) पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील कार्यकर्ता मेळाव्यात दोन्ही महापालिकेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले.

तसेच सत्तेचा गैरवापर करून प्रभाग रचना केल्याची आठवण करून देत आता आम्ही सत्तेत आहोत असा सूचक इशारा दिला. यामुळे यंदाच्या प्रभाग रचनेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचा वरचष्मा असेल असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या आजी माजी आणि इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, हे मात्र नक्की.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.