Pune News : लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी रद्द करा ; भारतीय मजदूर संघांची मागणी

एमपीसी न्यूज – लेबर कोड मधील कामगार विरोधी तरतुदी त्वरित रद्द करण्याची मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे. भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या बदल व सूचनांचा कोणताही विचार यामध्ये केला नसून कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेवर घाला करणारे हे बिल रद्द करावे, अशी मागणी करत पुण्यातील लेबर ऑफिस समोर भारतीय मजदूर संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

याबाबत कामगार उपायुक्त विकास पनवेलकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष हरी सोवनी, चिटणीस जालिंदर कांबळे, अभय वर्तक, अर्जुन चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, उमेश विस्वाद, सचिन मेंगाळे, निलेश खरात, बाळासाहेब पाटील, अण्णा महाजन, सचिन भुजबळ आदी उपस्थित होते.

नवीन लेबर कोडमध्ये कायम स्वरूपाचे रोजगार कमी होणार आहेत. तसेच कामगार कपात, ले ऑफ, क्लोजर करणे कंपनी व्यवस्थापनाला सोपे झाले आहे. कंपनीतील शोषण व अन्यायाविरूध्द सनदशीर संप करण्याबाबत मोठे बदल केल्यामुळे कामगार वर्गात तीव्र नाराजी व असंतोष निर्माण झाला आहे.

संसदेत दुसरा श्रम आयोग आणल्याचे नमूद केले आहे, पण श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार कामगारांच्या किमान वेतनात वाढ करणे, कामाची, कामगारांची परिस्थिती सुरक्षित करणं, सामाजिक सुरक्षा मुलभुत अधिकारात समाविष्ट करणे आदी शिफारशीचा नवीन लेबर कोडमध्ये समावेश केला नसल्याचे मजदूर संघाने म्हंटल आहे.

या कोडमुळे ऑक्युपेशनल हेल्थ ॲन्ड सेफ्टीचा लाभ सामान्य कामगारांना मिळू शकत नाही. अंमलबजावणीची यंत्रणा नवीन लेबर कोडमध्ये परीक्षण अभावी कमकुवत आहे. कामगार हित जोपासण्यासाठी कामगार विरोधी तरतुदी रद्द करण्याची मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.