Pune News : धोकादायक वीजयंत्रणेची माहिती व्हॉट्सॲपद्वारे द्या- महावितरण

0

एमपीसी न्यूज: जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदकामामुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे, अशा धोका निर्माण करणा-या यंत्रणेची माहिती व्हॉट्सॲपद्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणाकडून करण्यात आले आहे.

आत्तापर्यंत या माध्यमातून पुणे जिल्ह्यातून एकूण 293 तक्राती प्राप्त झाल्या असून त्यातील 220 तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी 7875767123 व बारामती परिमंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर तालुक्यांसाठी 7875768074 हा व्हॉट्स ॲप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या क्रमांकावर वीजवितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो, संपूर्ण पत्ता, लोकेशन अशी माहिती टाकावी. ज्या नागरिकांकडे व्हॉट्स ॲप नाही, त्यांनी या क्रमांकांवर एसएमएस करावा. याबरोबरच महावितरणाच्या टोल फ्री क्रमांकाची सेवादेखील चालू आहे.

ऊस गळीत हंगाम सुरु असल्याने सध्या ऊसतोडणीचे काम वेगाने सुरू असून ठिकठिकाणी लोंबकळणा-या वीजतारांचे घर्षण होऊन किंवा इतर विद्युत कारणांनी ऊसाला आगी लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

व्हॉट्स ॲपद्वारे प्राप्त झालेली फोटोसहित असलेली माहिती व तक्रार लगेच संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठवण्यात येत आहे. तसेच दुरुस्तीचे काम झाल्यावर संबंधित तक्रारकर्त्यांना व्हॉट्स ॲपद्वारेच दुरूस्तीचे छायाचित्र पाठवून कळवण्यात येत आहे.

या उपक्रमास नागरिकांनी सार्वजनिक वीजसुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य कराव, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.