Pune News : पार्सलच्या सेवेसोबत जेवणासाठीही रेस्टॉरंट्स खुली करावी – आमदार सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज – सध्या रेस्टॉरंट्समध्ये पार्सलची सेवा उपलब्ध आहे. आता जेवणाच्या व्यवस्थेसाठी त्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रातील रेस्टॉरंट्समधून सध्या केवळ पार्सल सेवा देण्याची परवानगी सरकारने दिली आहे. परंतु तेवढी पुरेशी नाही. रेस्टॉरंट व्यावसायिकांना त्यातून फारसे उत्पन्न मिळत नाही. मुंबईसह महाराष्ट्रात या व्यवसायावर पाच लाखाहून अधिक जणांचे संसार अवलंबून आहेत. शिवाय फिरतीवर असणाऱ्या अनेक लोकांकरीता रेस्टॉरंटमधील जेवण ही गरज आहे.

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात रेस्टॉरंट्स पूर्ण बंद होती. त्यानंतर पार्सल सेवा सुरु करण्याची परवानगी मिळाली. आता अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात जेवणासाठी रेस्टॉरंट्स खूली करण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा चाळीस टक्के रेस्टॉरंट्स बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे शिरोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

सरकारने घातलेल्या अटीशर्थींचे पालन करुन रेस्टॉरंट्स चालू केली जावीत. सामायिक अंतर राखावे, वस्तू हाताळण्यापूर्वी निर्जंतुकीकरण व्हावे, आदी नियमांसाठी तसेच कर्मचारी आणि ग्राहक यांच्या आरोग्याची दक्षता घेण्याबाबत रेस्टॉरंट मालकांची तयारी आहे. सरकारने त्याप्रमाणे कडक बंधनही घालावे. मात्र, गेले सहा महिने या व्यवसायाची झालेली कोंडी दूर व्हावी. रेस्टॉरंट व्यवसायावर दूध, भाजीपाला, धान्य पुरवठादार आदी व्यापारी अवलंबून असतात. रेस्टॉरंट्स खुली केल्यास त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल, कराद्वारे सरकारचे उत्पन्न वाढेल, असेही आमदार शिरोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

सरकारने खाजगी बससेवा, लॉजेस, एसटी बससेवा यांना परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे रेस्टॉरंट्सचाही विचार व्हावा, अशी विनंतीही शिरोळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.