Pune News : पुण्यातील निर्बंध शिथिल करावेत – विरेंद्र किराड

एमपीसी न्यूज – शहरातील कोरोना रुग्णांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे व्यापार क्षेत्रातील आर्थिक स्थिती सावरण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने लागू केलेले कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल करावेत, अशी मागणी पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विरेंद्र किराड आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांनी व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. 

शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या महिनाभरात घटले आहे. पुण्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. ही बाब राज्य सरकारने विचारात घ्यावी. तसेच, गेले सव्वा वर्ष टाळेबंदी आणि निर्बंध यामुळे शहरातील व्यापारी, उद्योग-व्यवसाय डबघाईस आलेले आहेत.

सध्या शहरात वीकेंड लॉकडाऊन आणि व्यवसायासाठी दुपारी चार वाजेपर्यंतची मुदत असल्याने व्यवसाय नीट चालत नाहीत. व्यापारावर अवलंबून असलेले हमाल, वाहतुकदार, छोटे दुकानदार, तेथील कामगार या सर्वांचीच आर्थिक स्थिती बिघडली आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी रात्री आठ वाजेपर्यंत व्यवसायास मुभा द्यावी आणि शनिवारचा लॉकडाऊन रद्द करावा, अशी मागणी विरेंद्र किराड यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

मुंबई आणि पुण्याला वेगवेगळे नियम लावू नयेत. शहर आणि ग्रामीण असे स्वतंत्र युनिट करुन निर्बंधांबाबतचे निर्णय घ्यावेत, असे पत्रकात म्हटले आहे.

पत्रकावर माजी महापौर कमल व्यवहारे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय बालगुडे, काँग्रेस पक्षाचे व्यापारी आघाडी प्रमुख बाळासाहेब अमराळे,  स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिवा मंत्री यांच्याही सह्या आहेत.

या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.