Pune News: मद्यधुंद निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची भरधाव कार दुकानात घुसली; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

संजय निकम असे निवृत्त पोलीस निरीक्षकांचे नाव असून ते गुन्हे शाखेच्या सामाजिक शाखेत कार्यरत होते

एमपीसी न्यूज- पुण्याच्या बाणेर-बालेवाडी परिसरात एका सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाने दारूच्या नशेत भरधाव कार चालवत आधी दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. त्यानंतर ही कार रस्त्यालगत असणार्‍या एका पंक्चरच्या दुकानात शिरली. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. आज (दि.6) दुपारच्या सुमारास बालेवाडीतील ममता चौकात हा अपघात झाला.

संतोष राठोड (वय 35) असे मृत्युमूखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राजेश सिंग आणि आनंद भांडवलीकर अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. कारचालक संजय निकम यांना चतुशृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले. संजय निकम हे काही दिवसांपूर्वीच पुणे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत.

संजय निकम हे आज दुपारच्या सुमारास बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरातून चार चाकी वाहनातून जात होते. दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या निकम यांचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि त्यांची कार रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीला जाऊन धडकली.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी दुचाकीवरील एक व्यक्ती खाली पडली तर दुसरी व्यक्ती दुचाकीवर अडकली आणि ती व्यक्ती कारबरोबर 100 मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. त्यानंतर ही भरधाव कार बालेवाडीतील ममता चौकातील रस्त्यालगत असणार्‍या एका पंक्चरच्या दुकानात घुसली.

त्यामुळे दुकानात असणाऱ्या तिघांना कारने उडवले. त्यानंतर जवळच असणार्‍या एका टेम्पोला धडक देऊन कार थांबली. या अपघातात दुचाकीवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी कारचालक संजय निकम यांना ताब्यात घेऊन जबर चोप दिला. तसेच जमलेल्या नागरिकांनी जखमी व्यक्तींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच चतुशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संजय निकम याला संतप्त नागरिकांच्या तावडीतून सोडवत ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.