Pune News : हडपसरमध्ये हमाल मापाडीच्या घरबांधणीसाठी जमीन देण्याची महसूल मंत्र्यांकडे मागणी

0

एमपीसी न्यूज – हडपसर येथील सर्व्हे नं. 39 अ जमीन हमाल मापाडी यांच्या घरबांधणीसाठी द्यावी, या मागणीचे निवेदन कै.आण्णासाहेब मगर तोलणार गृहरचना संस्थेच्या वतीने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले. या संदर्भात प्रशासकीय पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन थोरात यांनी शिष्टमंडळाला दिले.

लोहगाव विमानतळ येथे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी थोरात यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी, मागणीबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन थोरात यांनी दिल्याची सरचिटणीस हनुमंत बहिरट यांनी दिली. यावेळी, आमदार चेतन तुपे, माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते.

2002 पासून हमाल तोलणारांच्या घरबांधणीसाठी हडपसर येथील जमिनीची मागणी करण्यात येत आहे. 14 जुलै 2014 साली मुंबई येथील जुन्या सचिवालयात डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत जागा देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्याचे मान्य करण्यात आले होते. दरम्यान, 4 ऑगस्ट 2016 रोजी संबंधित जागा राखीव वन असल्यामुळे संस्थेची मागणी मान्य करता येत नसल्याचे कळविण्यात आले होते.

मात्र, यापुर्वीच या क्षेत्रातील जागा विविध संस्थेला देण्यात आली असून, त्याठिकाणी बांधकामे ही झाली आहेत. तर, अन्य क्षेत्रावर अतिक्रमण होत आहे. दरम्यान, संबंधित जागेत नोंद इतर हरकत दिसते. मात्र, ही जागा आमच्या ताब्यात नसल्याचे उपवन संरक्षण यांनी यापुर्वीच स्पष्ट केल्याचे निवेदनामध्ये स्पष्ट नमूद केले आहे. याबाबत राज्यसरकारकडून सकारात्मक निर्णय झाला तर शेकडो हमाल, मापाडींना त्यांचे हक्काचे घर मिळू शकणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III