Pune News : गाव खेड्यांचा विकास होण्यासाठी ‘रिव्हर्स मायग्रेशन’ आवश्यक – रवींद्र धारिया

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनवेळी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत राहणाऱ्या अनेक गावांतील लोकांनी आपपल्या गावी परत स्थलांतर केले. गावातील मुलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे असून वनराई संस्था ग्रामीण विकासाठी प्रयत्नशील आहे. गावामध्येच रोजगार निर्माण होऊन गावाचा विकास कसा साधता येईल यावर वनराई भर देत असून, गाव खेड्यांचा विकास होण्यासाठी ‘रिव्हर्स मायग्रेशन’ आवश्यक असल्याचे मत वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी व्यक्त केले.

अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ देण्यात आला यावेळी ते बोलत होते.

तसेच माजी राज्य जलसंधारणमंत्री राम शिंदे, राज्याचे माजी तुरुंग महानिरीक्षक विठ्ठल जाधव, महाएनजीओ फेडरेशनचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या वीस जणांना ‘समाजरत्न पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे, अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष धोंडीराम जवान आदी उपस्थित होते.

धारिया म्हणाले, हा पुरस्कार माझा सन्मान नसून गावागावात जे माझे सहकारी काम करतात त्यांचा हा बहुमान आहे. तसेच लहान मुलांमध्ये आणि शाळेतील मुलांमध्ये पर्यावरणबद्दलचे संस्कार घडावे, यासाठी गेली 20 वर्ष विविध स्पर्धेचे आयोजन करून पर्यावरणाविषयी जनजागृती केली जाते.

राम शिंदे म्हणाले, कोरोनाच्या महामारीमध्ये संपूर्ण राज्य, देश, जग कोरोनाग्रस्त झाले होते. शासन आणि प्रशासन काम करत असताना विविध सामाजिक संस्थेने सातत्याने लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शक्य तेवढी मदत केली. त्यामुळे समाजातील विविध संघटनांचे काम कौतुकास्पद आहे. जीवनात अनेक प्रसंग येतात आणि जातात त्यातून माणूस बऱ्याच गोष्टी शिकतो.

विठ्ठल जाधव म्हणाले, कोरोनाच्या काळात संपूर्ण राज्यात परराज्यामध्ये विविध संस्थांतर्फे अन्न धान्य वाटप, सॅनिटाईज, मास्क, रक्तदाब शिबिरे आयोजित करून मदत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे या विविध सामाजिक संस्था व्यक्तीमध्ये सामाजिक संवेदना आणि माणुसकी जिवंत आहे याची जाणिव होते. हे चांगल्या समाजरचनेसाठी आणि चांगल्या समाजजीवनासाठी आवश्यक आहे. या संस्थेचे काम हे तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. जीवनामध्ये स्वतःसाठी काय मिळवले यापेक्षाही दुसऱ्यासाठी काय करू शकलो यांचा आनंद खूप मोठा आहे.

शेखर मुंदडा म्हणाले, कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात फेडरेशनसह सर्व सामाजिक संस्था एकत्रित करून तीन लाख लोकांना मदत दिली. त्यामुळे सर्व संस्था एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्यामुळे अधिक गरजूंना मदत करण्यासाठी सोपे होईल. जेव्हा एखाद्या पुरस्काराने आपण सन्मानित होत असतो त्यावेळेस अजून काम करण्याचा उत्साह आणि जबाबदारी वाढते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.