Pune News : पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळेंकडून आढावा…!

एमपीसी न्यूज –  पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तेथील मेट्रोचा उड्डाणपूल तातडीने बांधण्याची मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी गुरुवारी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे केली. तेथील भूसंपादनाचे काम महापालिकेने केल्यानंतर तातडीने उड्डाणपूल बांधण्यास प्रारंभ करण्याचे आश्वासन दिवसे यांनी यावेळी दिले.

 

शिरोळे यांनी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पीएमआरडीए आणि टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली, त्यावेळी अनेक वाहनचालकांनी वाहतूक कोंडीची तक्रार केल्यामुळे पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल त्वरित करावा, अशी मागणी शिरोळे यांनी या बैठकीत केली आहे.

 

पुणे विद्यापीठ चौकात दोन्ही बाजूला ४.५ मीटरच्या रस्त्याची जागा ताब्यात घ्यावयाची आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण केल्यावर तेथील वाहतूक सुरळीत होईल व उड्डाणपुलाचे काम देखील जलद गतीने होईल, असे दिवसे यांनी सांगितले.

 

 

भूसंपादना संदर्भात पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी येत्या आठवड्यात शिरोळे चर्चा करणार आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ( पुणे मेट्रोपोलीटीन रिजन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी – पीएमआरडीए) ने प्रस्तावित केलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे सध्या तीन ठिकाणी काम सुरु आहे. या मार्गावर एकूण २३ मेट्रो स्थानके होणार आहेत. तसेच खांब उभारणीचे काम सुद्धा सुरु असून हिंजवडी येथे मेट्रो स्थानकाचे काम सुरु केले आहे आणि येणाऱ्या ३ वर्षात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या मार्गीकेचे काम पूर्ण करण्यात येणार आहे,  असे या बैठकीत सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.