Pune News : विविध मागण्यांसाठी रिक्षा पंचायतीचे मौन व्रत आंदोलन !

एमपीसी न्यूज : कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये रिक्षा चालकांना झालेल्या आर्थिक नुकसान भरपाईच्या मागणीसाठी रिक्षा पंचायतीच्या वतीने आज काँग्रेस भवनासमोर मौन व्रत आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या शहर कार्यालयांसमोर मौन व्रत आंदोलन केले जात असून यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यालयांपुढे आंदोलन झालेली आहेत.

रिक्षा पंचायतीचे नितीन पवार यांच्या नेतृत्त्वाखाली रिक्षा चालक, मालक यांनी आंदोलन केले. काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड आणि शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

पवार म्हणाले, लॉकडाऊनमध्ये जवळपास चार महिने रिक्षा रस्त्यांवर धावल्या नाहीत. त्यामुळे त्या चार महिन्यांचा विमा प्रिमीयम पुढे चार महिने गृहीत धरून सवलत द्यावी. तसेच तीन चाकी सहा आसनी रिक्षांचे अपघात आणि इन्शुरन्स क्लेम याचं प्रमाण अत्यल्प आहे. जोखीम कमी हप्ता जास्त आहे. त्यामुळे केंद्रसरकारने रिक्षाकडून अत्यल्प विम्याची रक्कम आकारावी.  रिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी अशा विविध मागण्या आम्ही केल्या आहेत.

जवळपास दहा लाख रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना किमान चार महिन्यांच्या विम्याची रकमेत मुदतवाढ द्यावी ही सरकारकडे मागणी आहे. महाविकास आघाडीचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यालयांसमोर मौन व्रत आंदोलन करत आहोत.

बागवे म्हणाले, राज्यसरकारकडे रिक्षा चालक व मालकांनी विम्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. परिवहन मंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावला जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.