Pune News : माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – 30  वर्षापेक्षा अधिक काळ सामाजिक क्षेत्रात दबदबा असलेले आणि माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रात नावाजलेले विजय कुंभार यांनी आज आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज आंबेडकर जयंतीच्या दिवशी हा पक्षप्रवेश ऑनलाईन पद्धतीने, आप राज्य समितीच्या उपस्थितीत झाला. आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी व आप राष्टीय कार्यकारी समिती सदस्य दुर्गेश पाठक यांनी त्यांचे स्वागत केले .

‘महाराष्ट्राच्या राजकारणात ग्रामपंचायतीच्या निवडणुकाच्या मार्गे आपने प्रवेश केलाच आहे. आता विजय कुंभार यांच्या सारख्या जेष्ठ माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या प्रवेशाने पक्ष संघटनेस अधिक बळकटी येईल.‘ असे दुर्गेश पाठक यांनी सांगितले. *विजय कुंभार यांची आप राज्य कार्यकारिणी सदस्य आणि ‘प्रदेश संघटक’ म्हणून नेमणुक करीत असल्याचे या वेळेस प्रभारी दुर्गेश पाठक यांनी जाहीर केले.

राजकारणी आणि बिल्डर लॉबीच्या अनेक प्रकरणांना विजय कुभार यांनी वाचा फोडली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीला आव्हान देण्याच्या कामात विजय कुंभार यांचासारखे योध्ये महत्वाचे योगदान देतील, अशी आशा आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी या वेळेस म्हंटले.

महाराष्ट्रातील सरंजामी आणि साम, दाम दंड भेदाच्या राजकारणाला आम आदमी पार्टी हाच पर्याय आहे. जनतेला आप कडून मोठ्या आशा आहेत. कुंभार यांच्या पक्ष प्रवेशामुळे नव्या उमेदीचे अनेक कार्यकर्ते पक्षाशी जोडले जातील व येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये याचे प्रतिबिंब दिसेल असे आपचे राज्य सयोजक रंगा राचुरे यांनी म्हंटले.

सह संयोजक किशोर मंध्यान यांनी विजय कुंभार यांच्या दीर्घ अनुभवाचा पक्षास मोठा फायदा होईल असे सांगितले.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणारे म्हणून विजय कुंभार यांची ओळख आहेच तसेच बिल्डर डी एस कुलकर्णी, टेंपल रोज रिअल इस्टेट घोटाळा यासारखे गैरव्यवहार बाहेर काढण्यातही त्यांचा महत्वाचा सहभाग आहे. ज्यामूळे अनेकजणांना तुरुंगात जावे लागले.. माहिती अधिकार कायदा २००५ अस्तित्वात येण्यामध्ये हातभार लावणाऱ्यामध्ये कुंभार यांचा सहभाग होता. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल यांच्या सोबत इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये ते सक्रीय होते. पुणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे आठवड्यातील एक दिवस जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध होण्यामागे कुंभार यांचे प्रयत्न होते. तसेच पुणे महापालिकेमध्ये माहिती अधिकाराचे ग्रंथालय सुरू करण्यात विजय कुंभार यांचा मोठा सहभाग आहे. या ग्रंथालयाला ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी प्रकाश कुदळे यांचे नाव देण्यात आले असून त्याचे उद्घाटन अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते झाले होते.

त्याचप्रमाणे कोणत्याही शासकीय कार्यालयातील कागदपत्रांचे नागरिकांनी अवलोकन करण्याची तरतूद देशात प्रथमच विजय कुंभार यांनी वापरली. यामुळे अशाप्रकारे कागदपत्रांचे अवलोकन करणारे ते देशातील पहिलेच नागरिक ठरले.जनतेला माहिती अधिकाराचा वापर करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी २०१४ मध्ये माहिती अधिकार कट्टा सुरु करण्यात आला. आजही दर रविवारी नियमितपणे हा कट्टा चालविला जातो. टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे मिरर द्वारा दिला जाणारा पुणे हिरो हा पुरस्कार विजय कुंभार यांना मिळाला आहे. या पुरस्कारासाठी ऑनलाइन मतदान घेण्यात आले होते.तसेच सजग नागरिक मंच सन्मान २००८, जीवाचा धोका असतानाही सामान्य माणसांना न्याय मिळवून देणाऱ्यांना दिला जाणारा नवलिनकुमार सन्मान पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना मिळाले आहेत.माहिती अधिकाराचा वापर करत अनेक यशस्वी लढे त्यांनी दिले आहेत. पुण्यातील सार्वजनिक जागांचा विनापरवानगी , परस्पर होणारा गैरवापर त्यांनी थांबवला . जागांच्या नोंदी सुरु झाली . पुणे शहरातील राजकारणी आणि अधिकारी यांचे परस्पर संगनमताने महापालिकेच्या जागा बळकावण्याचे उद्योग थांबवले, घरगुती गॅस सिलेंडर चा गैरवापर थांबवला , स्वच्छतागृहांसाठी आर्थिक तरतूद करणे भाग पाडले. शाळा गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदीतील घोटाळे त्यांनी बाहेर काढले आहेत.

‘पक्ष बळकट करण्याबरोबरच नागरिकांना त्यांचा सन्मान परत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे विजय कुंभार यांनी सांगितले. सध्या प्रत्येक शासकीय कार्यालयात येण-या नागरिकांना कोणत्या कायद्यान्वये किती शिक्षा होऊ शकते किंवा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो यासंदर्भातील फलक लावण्यात आलेले आहेत. हे फलक बेकायदा आणि या देशाचे मालक म्हणजे नागरिक यांना धमकी देणारे आहेत.लोकशाहीमध्ये हे अजिबात अपेक्षित नाही. त्यामुळे हे फलक काढ्ले जाऊन त्याजागी नागरिक या देशाचे मालक आहेत आणि त्यांचे सेवा हे आमचे परम कर्तव्य आहे अशा अर्थाचे फलक लावले जावेत यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करू‘ असेही विजय कुंभार या वेळेस म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.