Pune News : नदीपात्रातील मेट्रोच्या खांबांमुळे महापुराचा धोका ; ‘सीडब्लूपीआरएस’चा धक्कादायक अहवाल

एमपीसी न्यूज : महर्षी शिंदे पूल ते लकडी पुलादरम्यानच्या मेट्रोच्या खांबांमुळे महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राने (सीडब्लूपीआरएस) सादर केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे.

जलसंपदा विभागाने मुठा नदीच्या निर्धारीत केलेल्या निळ्या पूररेषेतच 1.45 किलोमीटर लांबीच्या मार्गात 60 खांब उभारले आहेत. त्या खांबांमुळे पूर पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक पात्र ओलांडून नदीपात्राबाहेर 183 फुट लांबीपर्यंत पूराचे पाणी लगतच्या नागरी वस्त्यांमध्ये शिरून पुणेकरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राने (सीडब्लूपीआरएस) सादर केलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

या अहवालाचा आधार घेत राज्यसभेच्या तत्कालीन खासदार अनु आगा, आरती किर्लोस्कर आणि सारंग यादवाडकर यांनी 24 मे 2016 मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल केली होती.

मेट्रोच्या नदीपात्रातील बांधकामांच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती. या समितीने नदीची रुंदी 25 टक्के जास्त गृहीत धरून पूर पातळीमध्ये केवळ 12 मिमी एवढी वाढ होईल, असा चुकीचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर मेट्रोच्या कामांना मान्यता दिली गेली.

मेट्रोने तज्ज्ञ समितीला चुकीची माहिती देऊन ‘एनजीटी’चीही फसवणूक केली आहे. त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून शास्त्रीय आणि सर्वमान्य मार्गाने मेट्रोच्या बांधकामात आवश्यक बदल स्वखर्चाने पुणे मेट्रोने करावा, अशी मागणी शहरातील पर्यावरण प्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी केली आहे.

खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण, सारंग यादवाडकर, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या अहवालामुळे मेट्रोचे नदीपात्रातील काम वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.