-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : आरएमसी दर वाढवण्याच्या मागणीसाठी आरएमसी प्लांट बुधवार पासून बेमुदत बंद

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – आरएमसी दर वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी पुणे आर एम सी असोसिएशनने आज (बुधवार, दि. 21) पासून शहरातील सर्व प्लांट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी सांगितले.

सोमवारी (दि. 19) असोसिएशनची बैठक पार पडली. बैठकीसाठी पुणे आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, तानाजी वाघोले, सचिन काटे, चैतन्य रायसोनी, नरेंद्र पासलकर, विक्रम धूत, नरेंद्र महाजन, युसूफ इनामदार, मछिंद्र सातव तसेच चाकण, भोसरी, मोशी, वाघोली, हडपसर, कोंढवा, कात्रज, चांदणी चौक, बावधन, बाणेर, वाकड, तळेगाव, मावळ येथील सभासद उपस्थित होते.

अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी याबाबत माहिती दिली, ‘असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत आर एम सी उत्पादनात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. 14 जुलै पासून जिल्ह्यातील स्टोन क्रशरकडून होणारा मालाचा पुरवठा बंद आहे. क्रशसॅण्ड आणि खडीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आर एम सी प्लाण्टला उत्पादनात बाधा येत आहे. डिझेलच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे.

मागील तीन वर्षांपासून डिझेल, पेट्रोल, रॉयल्टी, वीज यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचबरोबर गाड्यांच्या आणि मशिनरीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातसुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन करण्यास परवडत नाही. या सर्व कारणांमुळे व आरएमसीचे दर वाढवून मिळावेत यासाठी 21 जुलै पासून जिल्ह्यातील सर्व आरएमसी प्लांट बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबाबत खाण क्रशर असोसिएशनला देखील कळविण्यात आले असल्याचे अध्यक्ष वाल्हेकर यांनी सांगितले.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn