Pune News : मागील महिन्याभरात पुणे महापालिकेच्या तिजोरीत  तब्बल 188 कोटी रुपयांचा भरणा 

एमपीसी न्यूज – गेल्या वर्षी कोरोना काळात पुणेकरांनी विक्रमी मिळकत कर भरला होता. यंदा देखील शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गेल्या महिनाभरात पुणेकरांनी मिळकत कराच्या रुपातून महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 188 कोटी रुपयांचा भरणा केला आहे.

महापालिकेला नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मिळकतकरातून 188 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात 95 कोटी रुपयांची वाढ असून, जवळपास 83 टक्के नागरिकांनी ऑनलाइन करभरणा करून डिजिटल पर्यायाला पसंती दिल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी याच कालवधीत 87.16 कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळकत करातून मिळाले होते. आर्थिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतरच्या अवघ्या 30 दिवसांत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट मिळकत जमा झाला आहे.

गेल्या वर्षी नऊ मार्च रोजी शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर बाधितांची संख्या वाढू लागल्याने 23 मार्च रोजी देशभरात लॉकडाउन लागू झाला. एप्रिलपासून महापालिकेचे आर्थिक वर्ष सुरू होते. गेल्या वर्षी 1 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान केवळ 94 हजार 482 मिळकतदारांनी केवळ 87.16 कोटी रुपये कर भरला होता. यावर्षी मात्र याच कालवधीत तब्बल 1 लाख 69 हजर 474 मिळकतदारांनी 171.05 कोटी रुपयांचा मिळकत कर भरला असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालवधीत 4 लाख 77 हजार 843 मिळकतदारांनी 434.19 कोटी रुपये कर भरला होता.

कोरोनाच्या काळातही मुदतीत मिळकतकर भरून महापालिकेला सहकार्य करणाऱ्या मिळकतदारांना चालू वर्षीच्या मिळकतकराच्या बिलात सरकारचे कर वगळून 15 टक्क्यांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून, 30 मे पूर्वी अधिकाधिक मिळकतदारांनी कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आकारणी व कर संकलन प्रमुख विलास कानडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.