Pune News : रुग्णवाहिकांचे दरपत्रक आरटीओकडून जाहीर; दरपत्रक रुग्णवाहिकेच्या आतील दर्शनी बाजूस लावणे बंधनकारक

 

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांची ने-आण करताना रुग्णवाहिका चालक-मालक रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट करतात. याबाबतच्या तक्रारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) गेल्याने आरटीओने सुधारित दरपत्रक जाहीर केले आहे. या दरपत्रकानुसार तीन प्रकारच्या रुग्णवाहिकांना 11 रुपये पासून 13 रुपये प्रति किलो मीटर भाडे आकारता येणार आहे. पहिल्या 25 किलोमीटरसाठी अथवा दोन तासांसाठी 500 ते 900 रुपये भाडे आकारता येणार आहे. तसेच हे दरपत्रक रुग्णवाहिकेच्या आतील बाजूला दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांना तातडीने दवाखान्यामध्ये घेऊन जाणे तसेच विविध डायग्नोस्टिक सेंटर मध्ये रुग्णाला घेऊन जाण्याकरता रुग्णवाहिकांची आवश्यकता नागरिकांना भासत आहे. रुग्णवाहिका मालक – चालक यांच्याकडून रुग्णाची वाहतूक करताना जास्तीचे भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. त्यामुळे आरटीओकडून सुधारित दरपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

ज्या रुग्णवाहिका मालक-चालक ठरवून दिलेल्या भाडेदरापेक्षा जास्त आकारणी करतील अशा वाहनधारकाची तक्रार वाहन क्रमांकसह [email protected] या ई-मेल आयडी वर करावी. अशा तक्रारीची नोंद घेऊन त्यांच्यावर आरटीओच्या वायुवेग पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

सर्व रुग्णवाहिका चालक मालक संघटना, रुग्णालयांनी कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णसेवा करावी व कोणत्याही रुग्णाकडून अतिरिक्त भाडे आकारणी करण्यात येऊ नये असे आवाहन पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

रुग्णवाहिकांसाठी दरपत्रक –

1.  रुग्णवाहिका प्रकार – मारुती
25 किलोमीटर अथवा 2 तासांसाठी दर – 500 रुपये
पराती किलोमीटरसाठी दर – 11 रुपये
प्रति प्रतीक्षा तास – 100 रुपये

2.  रुग्णवाहिका प्रकार – टाटा सुमो, मेटाडोर इत्यादी सदृश कंपनीने बांधणी केलेली रुग्णवाहिका
25 किलोमीटर अथवा 2 तासांसाठी दर – 600 रुपये
पराती किलोमीटरसाठी दर – 12 रुपये
प्रति प्रतीक्षा तास – 125 रुपये

3. रुग्णवाहिका प्रकार – टाटा 407, स्वराज मझदा इत्यादी चॅसीसवर बांधणी केलेली रुग्णवाहिका
25 किलोमीटर अथवा 2 तासांसाठी दर – 900 रुपये
पराती किलोमीटरसाठी दर – 13 रुपये
प्रति प्रतीक्षा तास – 150 रुपये

रुग्णवाहिका चालक-मालक यांच्यासाठी अटी आणि शर्ती –

# वरील भाडेदर संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी लागू आहेत.

# वरील भाडेदर रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी आहेत. 25 किलोमीटरच्या पुढे अंतर गेल्यास प्रति तास प्रमाणे भाडे वाढ होईल. प्रतिक्षादर लागू राहतील.

# हे दरपत्रक रुग्णवाहिकेत आतील बाजूस प्रदर्शित करण्यात यावे.

# वाहन प्रवास न करता उभे असल्यास प्रत्येक तासाकरीता प्रतिक्षा दर लागू राहतील.

# प्रस्तावीत केलेल्या कमाल भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारात येणार नाही.

# रुग्णवाहिकेला जीपीएस प्रणाली असणे आवश्यक आहे.

# प्रत्येक फेरी नंतर रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.

# मोटार वाहन कायदा व त्यातील तरतुदीनुसार वेळोवेळी लागू होणारे नियम व अटी लागू राहतील.

# सर्व रुग्णवाहिका वातानुकूलित असल्याचे ग्राहय आहे. तसेच आवश्यकतेनुसार किंवा रुग्णाच्या विनंतीनुसार वातानुकूलित यंत्रणा चालू अथवा बंद ठेवता येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.