Pune News : पुणे स्मार्ट सिटी मानांकन घसरल्याने रुबल अग्रवाल यांची बदली

अतिरिक्त आयुक्त म्हणून रुबल अग्रवाल यांचे जोरदार काम सुरू आहे. त्यांनी जम्बो हॉस्पिटलमध्ये सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन केलेल्या पुणे स्मार्ट सिटीचे मानांकन घसरल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांना हटविण्यात आल्याची कुजबुज महापालिकेत सुरू आहे.

पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांचीही बदली करण्यात आली आहे.

त्यांच्या जागी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांची निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे पुणे स्मार्ट सिटीचाही पदभार देण्यात आला आहे.

तर, राजेंद्र निंबाळकर यांना अद्याप कोणतीही जबाबदारी देण्यात आलेले नाही. पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 25 जून 2016 रोजी स्मार्ट सिटीचे पुण्यात उदघाटन केले होते.

पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाची घसरण झाली आहे. पुणे स्मार्ट सिटी केंद्र शासनाच्या रँकिंगमध्ये थेट 28 व्या क्रमांकावर गेली होती. निधीच्या विनियोगाचे न केलेले नियोजन, नव्या प्रकल्पांचा अभाव यामुळेच हे मानांकन घसरले.

या नंतर स्मार्ट सिटीतर्फे माहिती अपडेट करण्यात आली. त्यामुळे 15 वे स्थान मिळाले. स्मार्ट सिटी प्रकल्पात महाराष्ट्रात पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, पिंपरी – चिंचवड, ठाणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे.

दरम्यान, मागील 5 ते 6 महिन्यांपासून पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. त्यामुळे रुबल अग्रवाल कोरोना संदर्भातील कामात व्यस्त आहेत. एक एक बेडस मिळविण्यासाठी सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. तसेच खाजगी हॉस्पिटलवर धडक कारवाई करण्याचा निर्णय अग्रवाल यांनी घेतला आहे.

त्यामुळेच त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी जोमाने काम करण्यासाठी संधी देण्यात आल्याचीही चर्चा सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त म्हणून रुबल अग्रवाल यांचे जोरदार काम सुरू आहे. त्यांनी जम्बो हॉस्पिटलमध्ये सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.