Pune News : सत्ताधारी भाजपने घेतला सांगलीचा धसका ; जीबीत हजेरीसाठी व्हीप जारी !

एमपीसी न्यूज : सांगली महापालिकेतील महापौर निवडीत भाजप नगरसेवकांची मते फुटली, राष्ट्रवादीचा महापौर विराजमान झाले. या घटनेचा धसका पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने घेतला असून आगामी मुख्य सर्वसाधारण सभेत 100 टक्के हजेरी बंधनकारक असल्याचा ‘व्हीप’ आदेश जारी केला आहे.

पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्ष आणि रिपाइं तब्बल 98 नगरसेवकांसह सत्तेत विराजमान आहेत. येत्या एक मार्च रोजी स्थायी समिती अध्यक्ष पदासह नव्याने स्थापन झालेल्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच मावळते स्थायी समिती अध्यक्ष सन 2021-22 आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर करणार आहेत.

दरम्यान सांगली महापालिकेत भाजपचा बहुमताचा जादुई आकडा असताना देखील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप नगरसेवकांची मते फोडली, अन् महापौर पदावर कब्जा केला. त्याचा जबरदस्त धसका पुणे शहर भाजपने घेतला आहे. संभाव्य धोका, घातपात आणि डॅमेज कंट्रोल टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून व्हीप जारी केला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.