Pune News : कोरोना आणि पुणेकरांच्या प्रश्नावरून सत्ताधारी – विरोधकांत जुंपली

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. रुग्णांना बेडस मिळत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांचे जीव जात आहेत. तर, मागील वर्षी जोरदार पाऊस होऊन त्यामध्ये 5 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतर्फे करण्यात आली. मात्र, राज्यात तुमचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे आधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सभा चालविण्याचे आदेश आणा, अशा शब्दांत भाजपने विरोधकांना सुनावले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षात सोमवारी पुणे महापालिकेच्या ऑनलाइन सभेत चांगलीच जुंपल्याचे चित्र दिसून आले.

सत्ताधारी दादागिरी करीत असल्याने विरोधी पक्षांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगररसेवकगणेश ढोरे, गफूरभाई पठाण, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी घोषणाबाजी केली. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे 5 नागरिकांचे बळी गेले होते. त्यावर प्रशासनाला खुलासा करू न देणे बरोबर नसल्याचे आबा बागुल यांनी सांगितले.

आज झालेल्या जोरदार पावसामुळे चेंबर्स तुंबले. वाहतूक कोंडी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती बिकट आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आपण काय नियोजन केले, असा सवाल शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी उपस्थित केला.

या पावसामुळे महापालिकेत येत असताना प्रचंड त्रास झाला. प्रशासनाने काय नियोजन केले, याचा खुलासा करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली.

पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे महापालिकेची सभा चालविण्याचे राज्य शासनाचे आदेश नाहीत. तुम्ही बेकायदेशीर कामकाज चालवा म्हणून ठाकरे सरकारचा अवमान करीत असल्याचे सभागृह नेते धीरज घाटे यांनी विरोधकांना सुनावले.

त्यावर तुम्हाला नियम पाळून सभा घ्यायला सांगितले आहे, तुम्हाला एवढा पुळका का? असा सवाल पृथ्वीराज सुतार यांनी उपस्थित केला. सभा तहकूब करून महापौर दालनात चर्चा करू, असे धीरज घाटे म्हणाले.

त्यावर खुलासा करताना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ड्रेनेज आणि रस्ते विभागाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचा आढावा घेणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

त्यावर हरकत घेत अशा प्रकारचा मोघम खुलासा करणे बरोबर नाही. कोणत्या विभागाला काय आदेश दिले, याचा खुलासा करावा, असेही त्यांनी म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.