Pune News: भारतीय स्त्रियांचा त्याग जगात महान – शंकरराव गायकर

एमपीसी न्यूज – भारतीय स्त्रियांचा त्याग जगात महान आहे,  असे गौरवोद्गार विश्व हिंदू परिषद मुंबई क्षेत्रीय मंत्री शंकरराव गायकर यांनी काढले.

विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने दिनांक 4 ते 11 मे या कालावधीत कर्वेनगर येथे भारतीय युवतींना सुसंस्कारित आणि स्वसंरक्षणार्थ सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या समारोप प्रसंगी शंकरराव गायकर यांनी मार्गदर्शन केले. कर्नावती क्षेत्र दुर्गावाहिनी संयोजिका डॉ. यज्ञा जोशी, प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत,  प्रांत उपाध्यक्ष माधुरी सौंची, प्रांत मंत्री संजय मुरदाळे, प्रांत सहमंत्री ॲड. सतीश गोरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

4 मे रोजी प्रशिक्षणार्थी युवतींचे एकत्रिकरण करण्यात आले. दिनांक 5 मे रोजी सकाळी मीना भट यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी मीना भट यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना आणि उद्दिष्टे याविषयीची माहिती दिली.

गायकर म्हणाले की, “रामायण काळात सीता, ऊर्मिला यांचा त्याग अद्वितीय होता. ती परंपरा रजपूत स्त्रियांनी पुढे चालवली. क्रांतिकारक भगतसिंग यांची माता विद्यादेवी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कुटुंबातील महिलांपासून असंख्य ज्ञात-अज्ञात महिलांनी कौटुंबिक पातळीवर केलेल्या त्यागामुळे भारतीय स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला. दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून युवतींना आपल्या मनगटातील बळाची अन् मनाच्या सामर्थ्याची जाणीव झाली आहे.

यावेळी समता, दंड, नियुद्ध, तलवार, रायफल, योगा, रोप योगा, सूर्यनमस्कार, ढोल पथक इत्यादी प्रात्यक्षिके दुर्गांनी करून दाखविले.  वर्गासाठी अनंता शिंदे, राजेश जाधव, तुषार कुलकर्णी, चंद्रकांत कदम, बौद्धिक व्यवस्थाप्रमुख प्रिया रसाळ, भगवती रायते,  अर्चना रानडे, प्रज्ञा सावंत, दत्ताराम रामदासी यांनी नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.