Pune News : पालिकेच्या तब्बल 18 हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या सर्व प्रकारचे आर्थिक काम संगणक प्रणालीच्या माध्यमातून करण्यासाठी नवीन संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्यात, कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित कामकाचाही समावेश आहे. मात्र, वेतना संबंधित प्रणालीची चाचणी न करताच ती थेट अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासनाच्या चांगलाच अंगलट आला आहे.

महापालिकेने पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नव्याने संगणक प्रणाली सुरु केली आहे. या प्रणालीत अनेक तांत्रिक अडचणी आल्याने पालिकेच्या तब्बल 18 हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्‍त करण्यात येत असल्याने प्रशासनाने पुन्हा जुन्याच पद्धतीने वेतनाची बिले तयार करून वेतन देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अर्धा एप्रिल संपला तरी अनेक कर्मचारी वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत.

महापालिकेकडून सर्व आर्थिक घटकांसाठी ऑनलाइन संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्याअंतर्गत पालिकेचे सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद याच संगणक प्रणालीतून ठेवली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिलपासून या प्रणालीचा वापर प्रशासनाने सुरू केला आहे. त्यामुळे, मार्चचे दिले जाणारे वेतन याच प्रणालीतून देण्यात येणार होते.

मात्र, या प्रणालीची चाचणी करून त्याचा वापर करणे अपेक्षित असताना चाचणी न करताच ती अंमलात आणली. त्यामुळे पगार बिले करताना लेखनिकांना अनेक वैधतेच्या (वॅलिडेशन) अनेक समस्यांचा सामना करावा लागला. परिणामी, महापालिकेस 7 एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांचे पगार करता आले नाहीत. त्यात, 10 एप्रिलपर्यंत पालिकेकडून या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत होत्या. मात्र, तांत्रिक समस्या सुटतच नसल्याने पालिकेने पुन्हा कर्मचाऱ्यांचे वेतन जुन्याच पद्धतीने बिले तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यानंतर टप्प्याटप्प्याने वेतन देण्यात येत असून सात ते आठ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन झाले असून उर्वरीत कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने वेतन देण्यात येत आहे. मात्र, या प्रकारामुळे कर्मचारी नाराज असून अर्धवट प्रणालीद्वारे वेतनाचा त्रास आम्हाला कशाला असा प्रश्‍न कर्मचारी उपस्थित करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.