Pune News : ‘समृद्ध जीवन फूडस’घोटाळा; दोन संचालकांना अटक

पुणे येथील विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

एमपीसी न्यूज – समृद्ध जीवन फूड्स इंडिया प्रा. लि. व समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पज  को. ऑप. सोसा. कंपनीने केलेल्या आर्थिक घोटाळयासंदर्भात राज्यात दाखल झालेल्या  4 गुन्हयांचा तपास महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करत आहेत. या कंपनीविरूध्द राज्यात तसेच भारतात विविध ठिकाणी देखील अनेक गुन्हे दाखल असून यातील मुख्य आरोपी असलेलले कंपनीचे संचालक मागील 5 वर्षापासून फरार आहेत. यापैकी कंपनीच्या दोन संचालकांना मंगळवारी (दि. 8) पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

हृषिकेश वसंत कणसे, (वय.30 ), सुप्रिया वसंत कणसे (वय. 36) रा. पुणे असे अटक केलेल्या मुख्य आरोपी व कंपनी संचालकांचे नावे आहेत. या दोन्ही आरोपींना पुणे येथील विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा कार्यभार स्विकारल्यानंतर महत्वाच्या गुन्हयातील फरार आरोपींबद्दल माहिती घेतली.
त्यानंतर विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाई अंतर्गत समृद्ध जीवन फूड्स इंडिया प्रा. लि. व समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पजच्या को. ऑप. सोसा. कंपनी विरूध्द दाखल गुन्ह्यांतील मुख्य आरोपी व कंपनीचे संचालक यांना अटक करण्यात आली आहे.

  काय आहे प्रकरण ?

समृद्ध जीवन फूड्स इंडिया प्रा. लि. व समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पजच्या को. ऑप. सोसा. कंपनीने पशुधन विक्री, संगोपन व खरेदी, पुन्हा खरेदी यासारख्या विविध आकर्षक, उच्च परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजना सुरू केल्या. याकरीता प्रचंड कमिशन वर एजंटची (12% कमिशन) नेमणूका करून व कंपनीचे विविध आकर्षक कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये विविध कार्यक्षेत्रातील सेलिब्रिटींना आमंत्रित केले.

या कंपनीच्या योजनांचा प्रचार तसेच प्रसार करून गुंतवणूकदारांना कमी वेळेत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या गुन्ह्यात एकूण 25 आरोपी आहेत.

यातील मुख्य आरोपी महेश मोतेवार, वैशाली मोतेवार, लिना मोतेवार, प्रसाद पारसवार, सुवर्णा मोतेवार, अभिषेक मोतेवार, विशाल चौधरी व इतर आरोपींना यापूर्वीच दाखल गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे.

कंपनीने गुंतवणूक व ठेवीदारांना अधिक व्याजाचे अमिष दाखवून लोकांकडून कोटयवधी रूपयाच्या ठेवी स्विकारल्या व कोणतीही रक्‍कम परत न करता अंदाजे 3700 कोटी रूपयांपेक्षा जास्त रूपये रकमेचा अपहार केला आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात या कंपन्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे गैर बँकींग कंपन्या (NBFC) म्हणून नोंदणीकृत नसल्याचे व कंपनीला ठेवी जमा करण्याचे कोणतेही अधिकार नसल्याचे निष्पन्न झाले आहे. उपलब्ध पुराव्यांवरून सर्व गुन्हयांत दोषारोपपत्र यापूर्वीच न्यायालयात दाखल झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अनेकवेळा आरोपींचा शोध घेण्याकरीता पथक महाराष्ट्र तसेच इतर राज्यांत पाठविले होते. परंतु, त्यांना यश मिळाले नव्हते. गुन्हयांत आत्तापर्यंत 233.33 कोटी रूपयाची मालमत्ता जप्त करण्यात आलेली असून अटक आरोपींकडून इतर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी परिश्रम, नियोजन यामुळे अनेक वर्षे गुंगारा देणारे आरोपी अटक करण्यात मोठे यश मिळाले आहे. आज आरोपींना पुणे येथील विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे.

या आरोपींना अटक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम वाळके, पोलीस निरीक्षक शैलजा बोबडे, पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, पोलीस हवालदार बाजीराव कुंजीर, प्रशांत पवार, राहुल कदम, निनाद माने, भूषण पवार व कविता नाईक यांनी परिश्रम घेतले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.