Pune News : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे 31 मार्च अखेर पूर्ण करावी – अजित पवार

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे 31 मार्च अखेर पूर्ण करण्यात यावी असे निर्देश उप मुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही मार्गांची कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण होतील, असे नियोजन करावे. एखादा प्रकल्प काही कारणांमुळे लांबला तर खर्चात वाढ होते. या दोन्ही मार्गांचे भूसंपादन आणि मावेजा वाटप करण्यात यावे. आवश्यकता भासल्यास विभागीय आयुक्त राव यांनी वेगळी बैठक घेऊन विषय मार्गी लावावा, असे आदेशही उप मुख्यमंत्री पवार यांनी दिले.

कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नसल्याने सर्वांना सण, उत्सव साधेपणाने साजरे करावे लागतील. त्यामुळे यंदाची शिवजयंतीही साधेपणाने साजरी करण्यात यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. याही वेळेस तसा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर राज्याचे प्रमुख अभिवादनासाठी येण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दिवशी अभिवादनासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवनेरी गडावर करण्यात येणारी विकासकामे दर्जेदार होतील, अशी दक्षता घेण्याच्याही सूचना त्यांनी केल्या. जेथे पुरातत्व विभाग, वन विभागाच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे तेथे परवानग्या घेण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.