Pune News : छुप्या पद्धतीने चीनी मांजा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सर्वजीव मंगल प्रतिष्ठानची मागणी

एमपीसी न्यूज : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंग आणि मांजा बाजारात आला आहे. चीनी आणि नायलॉन मांजामुळे गेल्या काही वर्षांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या मांजाच्या वापरावर बंदी असून छुप्या पद्धतीने चीनी मांजा विकला जात आहे. हा मांजा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली आहे. या मांजामुळे जखमी होणाऱ्या पक्षांच्या बचावासाठी हेल्पलाईन सुुरु करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

बोहरी आळीसह शहर आणि उपनगरांतील छोट्या-मोठ्या दुकानांत हा चीनी किंवा नायलॉनचा मांजा विकला जात आहे. पुणे, नाशिकसह विविध शहरात मांजाने गळा कापला गेल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याचे आपण पाहिले आहे. या माजांची निर्मिती, विक्री, साठवण, खरेदी व वापर करण्यावर कायद्याने बंदी आहे. हा मांजा सापडल्यास संबंधितांना पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखाच्या आर्थिक दंडाची तरतूद आहे. मात्र यंत्रणेच्या ढिलेपणाने हा मांजा बाजारात विकला जात आहे. घडलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन चीनी मांजाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी तसेच राष्ट्रीय हरित लवादाने यांत लक्ष घालावे, असे डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले.

सर्वजीव मंगल प्रतिष्ठान गेल्या 18 वर्षांपासून जखमी पक्षांच्या बचावासाठी काम करत आहे. मांजामुळे अनेक पक्षी जखमी होतात. गेल्या सात वर्षांत जवळपास 200 पक्षांना वाचवण्यात त्यांना यश आले असून, यंदाही एक रुग्णवाहिका, एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि चार-पाच कार्यकर्ते हे बचावकार्य मोहिम महिनाभर राबवणार आहेत. त्यासाठी डॉ. गंगवाल (9823017343) ही हेल्पलाईन उपलब्ध करून दिली आहे. अहिंसाप्रेमी नागरिकांनी यांत सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. गंगवाल यांनी केले आहे.

बर्ड फ्लूचा संसर्ग राज्यात पसरत असून त्यावर वेळीच उपाययोजना करून त्यांचे जीव वाचवायला हवेत. पक्षांवर ओढवलेली ही संक्रांत दूर करण्यासाठी सर्वांनी या पक्षी बचाव मोहिमेत पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.