Pune News : आठ दिवसांत ससून रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु होणार : अजित पवार

ससून रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळत नसल्याचा मुद्दा महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी उपस्थित केला.

एमपीसी न्यूज – येत्या 8 दिवसांत ससून रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ससून रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळत नसल्याचा मुद्दा महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी उपस्थित केला.

त्यावर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. ससून रूग्णालयात काही तांत्रिक अडचणी आल्याने रूग्ण दाखल करुन घेत नाहीत. परंतु, आठ दिवसात या अडचणी सुटतील व पुर्ववत क्षमतेने ससून सुरू होईल, असे सांगितले.

तसेच या रुग्णालयाबाबत तक्रारी अथवा त्रुटी निदर्शनास आणून दिल्या, त्या त्वरीत प्रशासनाने सोडवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने अनेकांना दवाखान्यात बेड्स उपलब्ध होत नाहीत. काहींना व्हेंटीलेटर, अँब्यूलन्स उपलब्ध होत नाही, ऑक्सिजन बेड्स उपलब्ध नाही, अशा परिस्थितीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आजची परिस्थिती अशी आहे की, गेले अनेक दिवसांपासून ससून रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण दाखल करुन घेत नाहीत. ऑक्सिजन व व्हेंटीलेटर तुटवडा आहे, असे कारण दिले जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

पुणे मनपाच्या डॅश बोर्डवर खाजगी रूग्णालयात बेड्स उपलब्ध नाही, असे दिसते. परंतु, प्रत्यक्षात बेड्स रिकामे असतात, जर एखादा रूग्ण थेट खासगी रुग्णालयात गेला तर त्यांना त्वरीत बेड्स उपलब्ध होतात.

त्यामुळे प्रशासनाने रूग्णालयातील ऐशी टक्के बेड्स आपल्या ताब्यात घेणे गरजेचे आहे. कोरोना व्यतिरिक्त इतर रूग्णांना काही खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेणे आवश्यक आहे. मात्र, असे होत नाही.

त्यामुळे त्याचा आजार वाढतो व नंतर कोरोनाचे सिम्टम आहेत, असे सांगून त्याच्यावर कोरोनाचा उपचार सुरु होतो. शेवटी त्यात त्या रूग्णाचे निधन होते. यासाठी कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराच्या रूग्णांवर त्वरीत उपचार झाले पाहिजे, अशी मागणी धुमाळ यांनी केली.

नॉन कोविड रूग्णांना काही दवाखाने उपचारासाठी घेत नाहीत. शिवाजीनगरमधील जम्बो हाॅस्पिटल आता चागंल्यापैकी सुधारणा होत आहे.

काही रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर काही रूग्णांवर चांगले उपचार सुरू आहेत. परंतु, यामध्ये अधिक सुधारणा होणे गरजेचे आहे. तर, बाणेर मधील डेडीकेअर हाॅस्पिटलचे मॅनेजमेंट बदलल्याने तेथे सुधारणा होत आहेत.

परंतु,अजुनही डाॅक्टर नर्सेस व टेक्निशन स्टाफ व इतर कर्मचारी उपलब्ध होत नाही. यामध्ये प्रशासनाने अधिक गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचेही धुमाळ म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.