-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : सावरकरांचे सामाजिक समतेचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज – चंद्रकांत पाटील

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सामाजिक समतेसाठी प्रत्यक्ष कृती केली आणि फार मोठा विचार मांडला. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप, महाराष्ट्रचा शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ आणि आदर्श शैक्षणिक समूह, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सावरकर एक गौरव गाथा’, या ऑनलाईन कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष बोलत होते. यावेळी स्वा. सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर, प्रकोष्ठचे संयोजक अमित कुलकर्णी, सहसंयोजक व आदर्श शैक्षणिक संस्था पनवेल या संस्थेचे प्रमुख विसपुते, सहसंयोजक भारत खराटे आणि स्वरदा फडणीस उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्ध असताना स्वा. सावरकरांनी 1924 ते 1937 या कालावधीत सामाजिक सुधारणांसाठी ऐतिहासिक कार्य केले. त्यांनी समाजातील चुकीच्या रूढी व परंपरांवर आघात केला व सामाजिक समतेचा फार मोठा विचार मांडला. जातीभेद संपत नाही आणि स्त्री पुरुष भेद संपत नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, असे मत त्यांनी मांडले. आज परिस्थिती बदलली असली तरी लोकांची मनस्थिती बदललेली नाही. त्यामुळे सामाजिक समतेबद्दलचे सावकरांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता आहे.

ते म्हणाले की, सावरकरांनी सामाजिक समतेचा विचार मांडला आणि प्रत्यक्ष कृतीही केली. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात विविध जातीच्या लोकांची सहभोजने केली तसेच विठ्ठल मंदिर सर्व जातींच्या लोकांना खुले असावे म्हणून आंदोलन केले. सर्व जातीधर्माच्या लोकांना प्रवेशास परवानगी असलेले पतीत पावन मंदिर स्थापन केले.

स्वा. सावरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून रत्नागिरीतील पतित पावन मंदिर ते मुंबईतील चैत्यभूमी अशी यात्रा काढण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्या काळात सावरकरांविषयी खूप वाचले. त्यांनी जी मते मांडली ती आगामी काळात खरी ठरली. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे आपण प्रभावित झालो, अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी सांगितली.

आपले राष्ट्र सामर्थ्यशाली हवे. दुबळे राष्ट्र विकास करू शकत नाही, असे सावकरांचे ठाम मत होते. अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संरक्षणाबद्दल ठाम पावले टाकल्यामुळे भारत कोणत्याही देशाशी संघर्ष करू शकतो, असा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn