Pune News : जीव वाचविणे हीच खरी मानवतेची सेवा : डॉ.अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज : एखाद्या व्यक्तीचा जीव वाचविणे हीच खरी मानवतेची सेवा आहे. ही सेवा कर्तव्य म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून गेलं जात आहे, असे गौरवद्गार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काढले.

गोखले नगर येथील लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे ‘झिरो बँकएक’ मोहीमेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. दीप प्रज्ज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘लोकमान्य’चे प्रमुख डॉ. नरेंद्र वैद्य, महामार्ग पोलीस अधिक्षक संजय जाधव, मेघाली काटदरे, डॉ.पराग ठुसे, डॉ.शार्दुल सोनार यांच्यासह अन्य सर्व डॉक्टर, परिचारिका, निमंत्रित उपस्थित होते.

खा.कोल्हे म्हणाले, कोविड काळात ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार तर दिलेच परंतु बिलांमध्ये सवलत देखील दिली. लोकमान्य हॉस्पिटलने नेहमीच संकटकाळात समाजाभिमुख भुमिका घेतली आहे. त्यामुळे पुणे-नाशिक, कल्याण-नगर महामार्गांच्या संगमावर आळेफाटा येथे ट्रॉमा केयर सेंटर उभारण्यासाठी लोकमान्यने पुढाकार घ्यावा यासाठी निमंत्रित करतो. कारण मानवतेच्या सेवेसाठी कर्तृत्त्व नव्हे तर कर्तव्य म्हणून लोकमान्य हॉस्पिटल करत आहेत.

या मोहिमेबद्दल डॉ. वैद्य म्हणाले, कोरोना लॉकडाऊन काळात वर्क फ्रॉम होममुळे अनेक लोकांना मानदुखी, कंबरदुखी आणि पाठदुखीचा त्रास झाला आहे. पोलीस आणि अन्य व्यवसायांमध्ये सातत्याने उभे राहून ज्यांचे काम आहे त्यांना देखील हा त्रास होतो. त्यांना शस्त्रक्रियेपर्यंत न पोहोचू देता, योगा, व्यायाम आणि संतुलित आहार देऊन त्यांना दुरूस्त करण्यावर ‘झिरो बँकएक’ मोहीमेचा भर असेल.

यावेळी अन्य मान्यवरांची मनोगतपर भाषणे झाली. डॉ. पराग ठुसे यांनी योगासनांची प्रात्यक्षिके घेतली. तर फिजिओथेरेपिस्ट डॉ. पुजा कुलकर्णी यांनी एर्गोनॉमिक्स ॲण्ड पोस्टरल अलाइनमेंटचे संगणकीय सादरीकरण केले.

डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी सूत्रसंचालन तर डॉ. हेमंत कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.